नवी दिल्ली: कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयाची थोडीशीही चिंता नाही. फक्त किती जागांच्या फरकाने जिंकणार, हाच आमच्यासाठी चर्चेचा मुद्दा असल्याचे मत काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले. त्यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.येत्या काही दिवसांमध्ये कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. सध्या देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये कर्नाटकचा समावेश आहे. मात्र, आगामी निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपा बाजी मारणारच, असा आत्मविश्वास भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना राजीव सातव यांनी म्हटले की, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे आम्हाला फारफार तर किती जागांच्या फरकाने जिंकणार, याविषयी चर्चा करावी लागेल, असे सातव यांनी म्हटले. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला दारूण पराभवाचा सामना करावा लागेल, असेही सातव यांनी सांगितले.
'कर्नाटकात काँग्रेसचा विजय नक्की, फक्त किती जागांनी हे बघायचं'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 10:20 IST