इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी अशा केंद्रीय तपास यंत्रणांकडून आल्याची बतावणी करत लोकांना लुटण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. दरम्यान, आता सांगलीमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे बनावट प्राप्तिकर अधिकारी बनून आलेल्या एका टोळक्याने खोटं तपासणी वॉरंट दाखवून एका डॉक्टरच्या घरातील कोट्यवधींच्या ऐवजावर डल्ला मारला. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार काही लोकांच्या डोळ्यांसमोर घडला मात्र कुणीही काहीही करू शकला नाही.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सांगलीतील कवठेमहांकाळ येथील गुरुकृपा रुग्णालयाचे डॉक्टर जे.डी. म्हेत्रे यांच्या घरी रात्री ११ वाजता तीन अज्ञात पुरुष आणि एक महिला घुसले. त्यांनी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाकी असल्याचे सांगत वॉरंट दाखवले आणि घराची झडती घेत घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख लुटली.
डॉ. म्हेत्रे यांचं गुरुकृपा नावाचं हॉस्पिटल असून, ते हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर राहतात. ही घटना घडली तेव्हा डॉ. म्हेत्रे आणि त्यांची पत्नी घरी होते. दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात पुरुष आणि एक महिला रुग्णालयात आले. आपण डॉक्टरांचे नातेवाईक असून, एका रुग्णासोबत आलो असल्याची बतावणी केली.
त्यानंतर रुग्णालयातील कंपाउंडर डॉ. म्हेत्रे यांना बोलवण्यासाठी घराच्या दिशेने जात होता. त्यावेळी हे लोकही त्याचा पाठलाग करत डॉक्टरांच्या घरात घुसले. घरात घुसल्यानंतर त्यांनी आपण प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच डॉ. म्हेत्रे यांना आपली ओळख आणि वॉरंटचं पत्र दाखवलं. त्यानंतर त्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. तसेच घरात मोडतोड केली. दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपासाला सुरुवात केली.