भूस्खलनामुळे कुटुंबं झाली उद्ध्वस्त; आशाही विरल्या, बेपत्ता लोकांबाबत सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:58 IST2025-01-15T13:57:58+5:302025-01-15T13:58:25+5:30
केरळमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली.

भूस्खलनामुळे कुटुंबं झाली उद्ध्वस्त; आशाही विरल्या, बेपत्ता लोकांबाबत सरकारचा मोठा निर्णय
केरळमध्येभूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. घरं कोसळली. याच दरम्यान, अनेक लोक बेपत्ता झाले, ज्यांचा बराच काळ शोध सुरू होता, परंतु आता केरळ सरकारने या बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने दोन समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी एक समिती राज्य पातळीवर स्थापन केली जाईल तर दुसरी समिती स्थानिक पातळीवर स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समित्या भूस्खलनात बेपत्ता झालेल्या लोकांना मृत घोषित करण्याचं काम करतील. या बेपत्ता लोकांचा वायनाड प्रशासन मृतांच्या यादीत समावेश करेल.
स्थानिक पातळीवरील समिती या बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यासाठी यादी तयार करेल. वायनाडमधील मेप्पडी पंचायतीचे सदस्य सुकुमारन यांनी माहिती देताना म्हटलं की, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात ३९ लोक बेपत्ता आहेत, ज्यांना आता मृत घोषित केलं जाईल.
गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये वायनाडच्या चूरलामला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं होतं. या काळात अनेक लोक बेपत्ता झाले. सुरुवातीला त्यांची संख्या ४७ असल्याचे म्हटलं जात होतं, परंतु नंतर असं आढळून आलं की ही संख्या ३९ होती, तर भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या २९८ होती.