देशातील काही राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि पूरसदृश परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नद्या आणि नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आलं आहे. याच दरम्यान शाळेकरी मुलांचे हाल होत आहेत.
पूर आणि पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांवर, जिथे सुविधांचा अभाव आहे. मुलं गुडघ्याभर पाण्यातून दप्तर आणि पुस्तकं घेऊन शाळेत जात आहेत. पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी विविध मार्ग शोधून काढत आहेत. देशाच्या पूर्व भागातही पावसाचा जोरदार परिणाम दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओडिशामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसामुळे रस्ते खचले, पूल तुटले
ओडिशामध्ये मुसळधार पावसानंतर अनेक भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्ते खचले आणि पूल तुटले आहेत. एका भागाचा दुसऱ्या भागाशी असलेला संपर्कही तुटला आहे. विशेषतः बालासोर जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे समस्या वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांना बोटींद्वारे रेशन घेण्यासाठी जावे लागत आहे.
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीनंतर प्रचंड नुकसान झालं आहे. सुमारे ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मंडीच्या करसोग आणि धर्मपूरमध्ये ढगफुटीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १६ जण बेपत्ता आहेत. तसेच ११७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. रस्ते, पूल, घरं वाहून गेले आहेत आणि पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.