पाणी पिण्यावरून झाला वाद, तरूणाला धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकवले
By Admin | Updated: March 29, 2016 10:32 IST2016-03-29T10:05:21+5:302016-03-29T10:32:18+5:30
पिण्याच्या पाण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर तीन माणसांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून त्याला धावत्या ट्रेनच्या खिडकीला बांधून ठेवल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली.

पाणी पिण्यावरून झाला वाद, तरूणाला धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकवले
ऑनलाइन लोकमत
इटारसी, दि. २९ - पिण्याच्या पाण्याच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर तीन माणसांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून त्याला धावत्या ट्रेनच्या खिडकीला बांधून ठेवल्याची घटना मध्य प्रदेशमधील इटारसी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात २५ मार्च रोजी ही घटना घडली, मात्र आता त्याचे फोटो समोर आले आहेत.
सुमीत काछी असे पीडित तरूणाचे नाव असून तो जबलपूरचा रहिवासी आहे. कामानिमित्त तो मुंबईत राहतो. २५ मार्च रोजी सुमीत जबलपूरहून पाटलीपुत्र लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये चढला. प्रवासादरम्यान खूप तहान लागल्याने सुमीतने त्याच्याच बोगीतील एका दुस-या प्रवाशाच्या बाटलीतून थोडे पाणी प्यायले. यावरून सुमीतच व गाडीतील इतर तीन व्यक्तीचा वाद झाल, ज्याचे पर्यवसन भांडणात झाले. त्यानंतर त्या तीन व्यक्तींनी सुमीतला बेल्टने बेदम मारहाण केली आणि एवढेच नव्हे तर त्याला ट्रेनच्या खिडकीला बांधून ठेवले. ही गाडी जबलपूरनंर थेट इटारसीला थांबते, त्सुयामुळे सुमीत अनेक तास धावत्या गाडीत खिडकीला त्याच अवस्थेत लटकला होता.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.