थिएटरमध्ये सिनेमा बघा फुकट
By Admin | Updated: June 6, 2014 15:20 IST2014-06-06T15:20:23+5:302014-06-06T15:20:50+5:30
सिनेमागृहांमधील तिकीटाचे दर गगनाला भिडले असतानाच केरळमधील एका मल्याळम चित्रपटाने प्रेक्षकांच्या खिशावरील भार हलका करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.

थिएटरमध्ये सिनेमा बघा फुकट
ऑनलाइन टीम
कोच्ची, दि. ६ - सिनेमागृहांमधील तिकीटाचे दर गगनाला भिडले असतानाच केरळमधील एका मल्याळम चित्रपटाने प्रेक्षकांच्या खिशावरील भार हलका करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात मोफत पाहता येणार असून चित्रपटा दरम्यान त्यांना जाहिरातीही बघाव्या लागतील.
केरळमध्ये १३ जूनरोजी टेस्ट सिग्नल हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनात निर्मात्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. हा चित्रपट केरळमधील काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट मोफत बघता येणार आहे. अर्थात यासाठी निर्मात्यांना फारसा आर्थिक तोटा सोसावा लागणार नाही. टीव्हीवर मालिका, सिनेमा किंवा क्रिकेट सामन्यांदरम्यान जशा जाहिराती लागतात तशाच जाहीराती या चित्रपटा दरम्यान लागतील. भारतातील हा पहिला प्रायोजित सिनेमा असेल असा या निर्मात्यांचा दावा आहे.
प्रेक्षकांना फुकट चित्रपट बघायला मिळणार असला तरी त्यांच्यावर जाहिरातीचा मारा केला जाणार नाही असे या चित्रपटाचे निर्माते एस. मनोज कुमार यांनी म्हटले आहे. सिनेमाच्या सुरुवातीला व मध्यंतरादरम्यान जाहिराती दाखवल्या जातील. यात व्यावसायिक जाहिरातीसोबतच सामाजिक संदेश देणा-या सरकारी जाहिरातीही दाखवू असे मनोज कुमार यांनी स्पष्ट केले. केरळमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास मराठी व हिंदी चित्रपट निर्मात्यांनी हा प्रयोग करुन बघायला हवा असे जाणकार सांगतात. मराठी निर्मात्यांनी हा प्रयोग केल्यास मराठी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग आणखी वाढेल असे दावाही केला जात आहे.