नवी दिल्ली : उद्योगपती अंबानी व रा. स्व. संघाशी संबंधित एक व्यक्ती अशा दोघांशी निगडित दोन फायलींना मंजुरी दिली तर ३०० कोटी रुपये लाच देण्याची तयारी मला दाखविण्यात आली होती. पण मी तो प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. या दोघांशी संबंधित व्यवहार रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला पाठबळ दिले, असेही मलिक म्हणाले.सत्यपाल मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत. राजस्थानमधील झुनझुनू येथे एका समारंभात त्यांना हे वक्तव्य केले. मलिक यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल झाल्यानंतर दोन फायली माझ्याकडे आल्या. त्यातील एक अंबानी यांच्याशी संबंधित होती व दुसरी फाईल रा. स्व. संघाशी संबंधित व्यक्तीची होती. हे गृहस्थ जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात मंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांपैकी होते. या दोन्ही फायलींशी निगडित प्रकरणांत गैरव्यवहार झाले असल्याचे मला दोन खात्यांनी कळविले. त्यामुळे मी या दोन्ही फायली नामंजूर केल्या. ते म्हणाले की, या फायलींना मंजुरी दिल्यास प्रत्येक प्रकरणाचे १५० कोटी असे तीनशे कोटी रुपये मिळतील, असे काही सचिवांनी मला सांगितले होते.
३०० कोटी लाच देऊ केली होती -सत्यपाल मलिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 06:25 IST