वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही? ओवेसींच्या प्रश्नावर रिजिजूंचे त्याच भाषेत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 00:13 IST2025-04-03T00:12:31+5:302025-04-03T00:13:33+5:30
Waqf Amendment Bill: केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही? ओवेसींच्या प्रश्नावर रिजिजूंचे त्याच भाषेत उत्तर
केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेच्या अखेरीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाची आवश्यकता अधोरेखित करताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षामधील नेते या विधेयकाला असंवैधानिक, बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यामध्ये नेमकं काय बेकायदेशीर आहे, हे मात्र सांगत नाही आहेत, असा टोला लगावला. तसेच वक्फवर दोन गैर मुस्लिम, मग हिंदूंवर, रामलल्लावर का नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या ओवेसी यांनाही रिजिजू यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
रिजिजू म्हणाले की, अनेक वाद सुरू आहेत. मात्र आपण जे करू शकतो ते केलं पाहिले. आपल्याकडे नोंदी असल्या पाहिजेत तेव्हाच आपण काही पाऊल उचलू शकतो. ओवेसी साहेब खूप विद्वान आहेत. त्यांनी आरोप केलाय की, असा कायदा हिंदूंसाठी का तयार केला जात नाही. मात्र हिंदूंमध्ये अशी तरतूद आधीपासून आहे. इस्लाममध्ये महिला आणि मुलींसाठी आम्ही तरतूद करत आहोत. तेही आमच्या देशाचे नागरिक आहेत. आम्ही त्यांना सोडणार नाही.
रिजिजू पुढे म्हणाले की, आता येथील चर्चेदरम्यान, म्हटलं गेलं की, जिल्हाधिकारी हे असं पद आहे जे केवळ नुकसान करण्यासाठीच तयार केलं गेलेलं आहे. पण त्यावर विश्वास ठेवता कामा नये, जिल्हाधिकाऱ्यांचं मूळ काम हे महसूल आणि प्रशासन हे असतं. ते जिल्ह्याचे कल्याणकारी अधिकारी असतात. जर तुमचा त्यांच्यावरच विश्ववास नसेल तर तुम्ही कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. जिल्हाधिकारी तर कुठल्याही पक्षाचे नसतात, असा टोलाही रिजिजू यांनी लगावला.
वक्फ संशोधन विधेयकावर झालेल्या चर्चेच्या अखेरीस किरेन रिजिजू म्हणाले की, विरोधी पक्षांमधील नेते हे वक्फ संशोधन विधेयकाला बेकायदेशीर म्हणत आहेत. मात्र त्यात नेमकं काय बेकायदेशीर आहे. हे मात्र त्यांना सांगता येत नाही आहे. त्यामुळे ते माझं म्हणणं समजून घेतील ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणं सोडून दिलं आहे. सभागृहामध्ये अनेक अतार्किक गोष्टीही बोलल्या गेल्या. असेही ते म्हणाले.