Simhachalam Temple Latest News Today: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरात दुर्दैवी घटना घडली. चंदनोत्सवानिमित्ताने देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावर भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. यात ८ भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर या आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिराच्या परिसरात ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये दरवर्षी चंदनोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे भगवान नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक याठिकाणी येतात. यावर्षीही भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. हे मंदिर सिंहाचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
नव्यानेच बांधलेली भिंत कोसळली
चंदनोत्सवामुळे मंदिराबाहेर भाविकांची लांब रांग लागलेली होती. मंदिर परिसरात असलेल्या एका दुकानाची नव्यानेच बांधलेली भिंत भाविकांची रांग असलेल्या बाजूला कोसळली. यात आठ भाविकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडण्याच्या काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता.
वाचा >>MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत
पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरले आणि त्यामुळे भिंत ढिसूळ होऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री अडीच ते ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या. वेगाने मदत कार्य सुरु करण्यात आले.
गृहमंत्री घटनास्थळी पोहोचले
दुर्घटनेबद्दल कळल्यानंतर आंध्र प्रदेशचे गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना मदतकार्यासंदर्भात सूचना दिल्या.
मुसळधार पावसामुळे आणि भाविकांचा भार पडल्यामुळे ही घटना घडली असावी, असे त्यांनी सांगितले. भाविका ३०० रुपयांच्या विशेष दर्शन पाससह रांगेत उभे होते. पावसांचे पाणी मुरल्यामुळे भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे ती कोसळली, अशी माहिती त्यांनी दिली.
चंदनोत्सवाचे महत्त्व काय?
नरसिंह मंदिरात दरवर्षी चंदनोत्सव होतो. अशी पौराणिक कथा आहे की, या काळात श्री वराह लक्ष्मी नरसिंह जागृत अवस्थेत असतात आणि भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे इथे या काळाच जास्त गर्दी असते.