काँग्रेस नेते खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांनी 'मत चोरी'चा आरोप करत, "सकाळी 4 वाजता उठा, 37 सेकंदांत दोन मतदार डेलिट करा आणि परत झोपी जा," असे म्हटले आहे. यानंतर, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. "त्यांच्या (राहुल गांधी) अपयशी नेतृत्वाने काँग्रेस वारंवार पराभूत होत आहे आणि देशाची जनता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे.
राहुल गांधींवर उपरोधिक टीका करताना रिजिजू म्हटले, ते आपल्या कमकुवतपणावर पडदा टाकण्यासाठी, देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरच आरोप करत आहेत. गरीब, शेतकरी आणि सामान्य लोक मोदींना आपला नेता मानतात. राहुल गांधींसारखे लोक अशा इंजिनाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे भारताला पुढे नेत आहे.
राहुल यांच्या 'पुराव्या'नंतर भाजपचा पलटवार -खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी एका प्रेझेंटेशनदरम्यान दावा केला की, आपल्याकडे मतदार यादीतून नावे काढल्याचे "100 टक्के पक्के पुरावे" आहेत. यावेळी त्यांनी 37 सेकंदांचा एक व्हिडिओही शेअर केला. त्यात, 19 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 4 वाजता, 36 सेकंदात दोन मतदारांची नावे काढण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना राहुल उपहासाने म्हणाले, "निवडणूक चौकीदार जागत राहिला, चोरी बघत राहिला आणि चोरांचे संरक्षण करत राहिला."
यानंतर, माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार अनुराग ठाकुर म्हटले, "राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस 90 टक्के निवडणुका हरली आहे. राहुल यांची निराशा वाढत आहे. खोटे आणि निराधार आरोप करणे ही त्यांची सवय झाली आहे."
खरे तर, राहुल गांधींनी कर्नाटकातील आळंद येथे मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे काढण्या आली असल्याचा आरोप केला आहे. बनावट लॉग-इन आणि बाहेरील फोन नंबर्सद्वारे 'केंद्रीकृत सॉफ्टवेअर'च्या माध्यमातून हा खेळ झाला, असा त्यांचा दावा आहे. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा हा आरोप फेटाळून लावत, मतदार यादीतून नावे काढण्याचे काम सामान्य लोक करू शकत नाहीत, असे म्हटले आहे.