दुपारनंतर वाढला स्नानासाठी ओघ
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30
गर्दीत वाढ : रामकुंडाकडे जाणारे रस्ते केले बंद

दुपारनंतर वाढला स्नानासाठी ओघ
ग ्दीत वाढ : रामकुंडाकडे जाणारे रस्ते केले बंदनाशिक : कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीत शनिवारी सकाळी साधूंचे शाहीस्नान आटोपल्यानंतर भाविकांची फारशी गर्दी नसताना, दुपारी तीननंतर मात्र भाविकांचा ओघ अचानक वाढला. सायंकाळी रामकुंड परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसल्याने रामकुंडाकडे जाणारे रस्ते पुन्हा बंद करण्यात आले. साधू-महंतांच्या तिन्ही आखाड्यांचे शाहीस्नान शांततेत झाल्यानंतर सकाळी भाविकांची तेवढी गर्दी नव्हती. दुपारी तीनपर्यंत हीच परिस्थिती कायम होती; मात्र त्यानंतर अचानक सगळीकडूनच गोदाघाटाकडे भाविकांचे लोंढे वाढण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास रामकुंड, यशवंतराव महाराज पटांगणासह परिसरात भाविकांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेड्सद्वारे लोकांना ठिकठिकाणी रोखून ठेवले होते. यशवंतराव महाराज पटांगणावर लोकांना बराच काळ थांबवून ठेवल्याने त्यांचा संयम सुटला व काही भाविकांनी बांबू वाकवून रामकुंडाकडे प्रवेश केला. सुमारे दहा मिनिटांनंतर पोलिसांनी परिस्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवले. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ६ नंतर रामकुंडाकडे येणारे सर्व रस्ते बंद करीत असल्याची घोषणा केली. भाविकांना फक्त शाही मार्गानेच रामकुंडात प्रवेश दिला जाईल, अशी सूचना देण्यात आली. तोपर्यंत रामकुंडाकडे येणार्या रस्त्यांवर भाविकांची गर्दी झाली होती. मालेगाव स्टॅण्ड येथे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन हजर होते व प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, सकाळी स्नानासाठी गर्दी नसल्याने सायंकाळनंतर शहरातील रस्ते काही प्रमाणात खुले होतील, अशी नागरिकांत अपेक्षा होती; मात्र सायंकाळी रस्त्यांचा फास पुन्हा आवळल्याने ती फोल ठरली. नागरिकांना पायपीट करावी लागत असल्याने अनेकांचे पोलिसांशी खटके उडत होते.