‘व्योममित्रा’ करणार अवकाश सफर, गगनयान मोहीम डिसेंबर २0२१ मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 05:18 AM2020-01-23T05:18:46+5:302020-01-23T05:19:24+5:30

गगनयान ही भारताची पहिली अंतराळ मोहीम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्णत्वास जाणार असून, त्यापूर्वी ‘व्योममित्रा’ ही महिला रोबो (ह्युमनॉईड) अंतराळ सफर करणार आहे.

'Vyomitra' Space Tour, Gagnayan Campaign in December 2021 | ‘व्योममित्रा’ करणार अवकाश सफर, गगनयान मोहीम डिसेंबर २0२१ मध्ये

‘व्योममित्रा’ करणार अवकाश सफर, गगनयान मोहीम डिसेंबर २0२१ मध्ये

googlenewsNext

बंगळुरू : गगनयान ही भारताची पहिली अंतराळ मोहीम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्णत्वास जाणार असून, त्यापूर्वी ‘व्योममित्रा’ ही महिला रोबो (ह्युमनॉईड) अंतराळ सफर करणार आहे. बुधवारी तिची पहिली झलक पाहून सर्व भारतीय आनंदले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.
‘मानवी अंतराळ मोहीम आणि संशोधन : विद्यमान आव्हाने आणि भविष्याकडे वाटचाल’च्या उद्घाटन सत्रात ‘व्योममित्रा’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोन संस्कृत शब्द व्योम (अंतराळ) आणि मित्र (मित्र) हे दोन्ही शब्द मिळून व्योममित्रा हा शब्द तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात रोबोने स्वत:ची ओळख करून दिल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. भारतीय अंतराळवीरांना ‘गगनयान’ अंतराळात नेण्यापूर्वी ‘व्योममित्रा’ अंतराळात जाणार आहे. (वृत्तसंस्था)

मोहिमेत अंतराळवीरांची साथ करणार
ती म्हणाली- सर्वांना नमस्कार, मी व्योममित्रा आहे. मला अर्ध मानव रोबोच्या रूपात पहिल्या गगनयान या मानवरहित अंतराळ मोहिमेसाठी तयार करण्यात आले आहे.
आपणाला सतर्क करणार आहे व जीवनरक्षक प्रणालीवर लक्ष ठेवणार आहे. मी स्वीच पॅनलच्या संचालनासह अनेक काम करणार आहे. मी अंतराळ मोहिमेत अंतराळवीरांची साथ करणार असून, त्यांच्याशी संभाषणही करेन.

इस्रोकडून २०२० मध्ये पहिली मानवरहित मोहीम

गगनयान मोहिमेच्या तयारीबाबत इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, व्योममित्रा अंतराळात मानवाप्रमाणे काम करील. सर्व प्रणाली व्यवस्थितरीत्या काम करीत आहेत की नाही, यावर ती नजर ठेवील. ही खूप मोठी उपलब्धी आहे. भारत डिसेंबर २०२१ च्या मानवी अंतराळ मोहिमेपूर्वी डिसेंबर २०२० व जून २०२१ मध्ये दोन मानवरहित मोहिमा राबवणार आहे.

भारताच्या गगनयान मोहिमेचा उद्देश केवळ अंतराळात भारताचे पहिले मानवी अंतराळ यान पाठवणे हा नसून, अंतराळात कायमस्वरूपी मानवाचे अस्त्वित्व ठेवण्यासाठी नवीन अंतराळ केंद्र स्थापित करणे हाही आहे. याबाबत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बंगळुरूजवळ अंतराळरीवांसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

इस्रो सध्या नासा व इतर अंतराळ संस्था, तसेच इतर उद्योगांशीही चर्चा करीत आहे. त्यांच्या अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकता येईल, यासाठी हा प्रयत्न आहे.गगनयान आंतरग्रहीय मोहिमेच्या दीर्घकालीन लक्ष्यप्राप्तीसाठीही फायदेशीर ठरणार आहे. गगनयानला एका कक्षेत पोहोचवणारा १० टन पेलोड क्षमतेचा संरचनात्मक लाँचर यापूर्वीच तयार करण्यात आलेला आहे. आता मानवी जीवन विज्ञान व जीवनरक्षक प्रणालीवर काम सुरू आहे.

गगनयान मोहिमेत अनेक राष्टÑीय प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल, सीएसआयआर प्रयोगशाळांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली आहे.

Web Title: 'Vyomitra' Space Tour, Gagnayan Campaign in December 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.