बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:14 IST2025-11-08T18:00:42+5:302025-11-08T18:14:54+5:30
बिहारमध्ये काल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान, आता समस्तीपूरमधील सराईरंजन येथील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर व्हीव्हीपॅट स्लिप्स पडल्याचे दिसत आहे.

बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. निवडणुका जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून निवडणूक आयोगावर आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता बिहारमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन विधानसभा मतदारसंघातील केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला ईव्हीएममधील मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट स्लिप्स पडल्याचे समोर आले. राष्ट्रीय जनता दलाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
आरजेडीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली. "समस्तीपूरच्या सरायरंजन विधानसभा मतदारसंघातील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर ईव्हीएममधील मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट स्लिप्स फेकल्या. या स्लिप्स कधी, कसे, का आणि कोणाच्या इशाऱ्यावर फेकल्या गेल्या? चोर आयोग याचे उत्तर देईल का? हे सर्व बाहेरून येऊन बिहारमध्ये तळ ठोकून बसलेल्या लोकशाहीच्या लुटारूच्या इशाऱ्यावर घडत आहे का?, असा सवाल या पोस्टमध्ये केला आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे आणि संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकारी (ARO) यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले. त्यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत. समस्तीपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांना या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉक पोल दरम्यान या व्हीव्हीपीएटी स्लिप्स वापरण्यात आल्या होत्या आणि त्यांची विल्हेवाट लावण्यात एआरओच्या निष्काळजीपणामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या अखंडतेवर कोणताही परिणाम झाला नाही. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना कळवले आहे, असे निवडणूक आयोगाने एक अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले .
बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी झाले. सराईरंजन विधानसभा मतदारसंघातही पहिल्या टप्प्यात मतदान झाले. प्रत्यक्ष मतदानापूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे योग्य कार्यप्रदर्शन पडताळण्यासाठी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मॉक पोल घेतले जातात. मतदानानंतर दोन दिवसांनी शीतलपट्टी गावात कचऱ्यात व्हीव्हीपॅट स्लिप्स आढळल्या. महाआघाडीतील पक्ष याबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत. वाद वाढत असल्याचे पाहून समस्तीपूरचे जिल्हा दंडाधिकारी रोशन कुशवाह आणि पोलिस अधीक्षक अरविंद प्रताप सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विरोधी पक्षांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
समस्तीपुर के सरायरंजन विधानसभा क्षेत्र के KSR कॉलेज के पास सड़क पर भारी संख्या में EVM से निकलने वाली VVPAT पर्चियां फेंकी हुई मिली।
कब, कैसे, क्यों किसके इशारे पर इन पर्चियों को फेंका गया? क्या चोर आयोग इसका जवाब देगा? क्या यह सब बाहर से आकर बिहार में डेरा डाले लोकतंत्र के… pic.twitter.com/SxOR6dd7Me— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 8, 2025