उपराष्ट्रपतिपद : भाजपाचे नायडू की विद्यासागर राव?
By Admin | Updated: July 7, 2017 01:42 IST2017-07-07T01:42:41+5:302017-07-07T01:42:41+5:30
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष दिल्लीत ११ जुलै रोजी एकत्र येत आहेत

उपराष्ट्रपतिपद : भाजपाचे नायडू की विद्यासागर राव?
हरीश गुप्ता/ लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष दिल्लीत ११ जुलै रोजी एकत्र येत आहेत तर याचसाठी भाजपा नेत्यांची बैठक १५-१६ जुलै रोजी होईल. भाजपातर्फे एम. व्यंकया नायडू व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची नावे चर्चेत आहेत.
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस १८ जुलै असल्यामुळे भाजपा निवांतपणे काम करीत आहे. भाजपामधील उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा उमेदवार दक्षिण वा ईशान्य भारतातून देण्याच्या विचारात आहे. उमेदवाराला पुरेसा संसदीय अनुभव असावा व त्याला राज्यसभेत बेबंद सदस्यांना शिस्तीत राखता आले पाहिजे, अशी भाजपाची भूमिका आहे. सध्या २४३ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपाला मित्रपक्ष व नामनियुक्तांसह ९० खासदारांचा पाठिंबा आहे. पुढील दोन वर्षे भाजपासाठी खूपच महत्त्वाची आहेत. विरोधक एकत्र येत असताना राज्यसभेचे सभापती असलेले हे पद दुबळे व अनुभव नसलेले चालणार नाही. त्यामुळे व्यंकय्या नायडू हे चर्चेत आहेत. भाजपाचे ते जुने निष्ठावंत व मोदीभक्त आहेत. गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर जायला सांगण्याची त्यांची क्षमता आहे.