दिल्लीत आज मतदान; भाजप, आप अन् काँग्रेसची शक्ती पणाला
By Admin | Updated: February 7, 2015 02:42 IST2015-02-07T02:42:19+5:302015-02-07T02:42:19+5:30
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली दिल्ली विधानसभेची प्रतिष्ठेची निवडणूक आज शनिवारी पार पडत आहे.

दिल्लीत आज मतदान; भाजप, आप अन् काँग्रेसची शक्ती पणाला
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली दिल्ली विधानसभेची प्रतिष्ठेची निवडणूक आज शनिवारी पार पडत असून चोख बंदोबस्तात १२,१७७ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १.३३ कोटी मतदार हक्क बजावत आहेत. ७० जागांसाठी होत असलेली ही निवडणूक केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीसाठी सार्वमत मानले जात असले तरी भाजपच्या नेतृत्वाने हा दावा फेटाळला आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर झेंडा फडकविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पुन्हा गमावलेला जनाधार परत मिळवत पक्षात पुन्हा जोश आणल्यामुळे काट्याचा संघर्ष होऊ घातला आहे. मोदींची प्रतिमा पणाला लागल्यामुळे भाजपनेही संपूर्ण ताकद झोकली आहे. एकूण ६७३ उमेदवार रिंगणात असून अनेक मतदारसंघात तिरंगी लढतींनी चुरस निर्माण झाली आहे. एकूण ७१४ मतदान केंद्रे संवेदनशील तर १९१ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
जुगार चालणार काय?
१६ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या भाजपने टीम अण्णाच्या पूर्वाश्रमीच्या सदस्य किरण बेदी यांना थेट मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ठरवत जुगार खेळला आहे. बेंदींच्या उमेदवारीने भाजपच्या तळागाळात असंतोष उफाळला असताना हा डाव साधला जाणार काय? असा सवाल राजकीय विश्लेषकांनी विचारला आहे. गेल्यावर्षी मे मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव काही अंशी कायम राहिला असला तरी मोदींची घोडदौड दिल्लीत थांबेल काय? याचे उत्तरही ही निवडणूक देणार आहे.
भाजपची चिंता कायम
निवडणूक सर्वेक्षणांनी ‘आप’च्या झोळीत सत्तेचे माप टाकलेले दिसत असताना भाजपला पराभवाची चिंता लागलेली दिसून येते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हे सार्वमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी अशाच प्रकारच्या विधानाबद्दल सारवासारव केली तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही सार्वमत ठरत नसल्याचे सांगत एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षणाची ढाल प्रदान केल्याचे मानले जाते. डिसेंबर २०१३ पर्यंत १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसची तिसऱ्या स्थानी पिछेहाट दाखविली जात आहे. किमान दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हान या पक्षासमोर उभे ठाकले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजपच्या जाहीरातीवरून वादंग
भाजपने दिल्लीत शनिवारी मतदान होत असताना केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधणाऱ्या जाहिराती विविध वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केल्यामुळे आपने आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधले आहे. शुक्रवारी दिल्लीतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भाजपच्या जाहिराती प्रसिद्धी झाल्या असून हे आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन असल्याचे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी म्हटले.
वावगे काहीही नाही- आयोगाचा खुलासा
४भाजपने दिल्लीच्या मतदारांना शनिवारी मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्या तरी त्यात चूक काहीही नाही. भाजपने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
बेदींनी लाटल्या पोळ्या, केजरीवालांचा योगा
बेदींनी शुक्रवारी कृष्णनगर मतदारसंघातील एका गुरुद्वारात प्रार्थना केल्यानंतर स्वयंपाकगृहात जाऊन लंगरसाठी पोळ्याही लाटल्या. शीख मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न मानला जातो. दुसरीकडे आप नेते अरविंद केजरीवाल यांनी योगा केला. तसेच गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली.
मोदींना पंतप्रधानपदावरून पदावनती करीत मुख्यमंत्रिपदात स्वारस्य असल्याचे दिसते. अन्यथा त्यांनी भाजप सरकारने आठ महिन्यांत जे काम केले नाही त्याच्या जाहिराती कशाला केल्या असत्या? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी केला आहे.
आम आदमी पार्टीला एक तर आचारसंहितेच्या कायद्याची माहिती नसावी किंवा या पक्षाचे नेते केवळ बातम्यांचा विषय बनण्यासाठी अशा प्रकारची विधाने करीत असावेत. असे प्रत्युत्तर भाजपने दिले.
सर्वाधिक १८, सर्वात कमी ४ उमेदवार
उत्तर दिल्लीतील बुरारी मतदारसंघात सर्वाधिक १८ तर दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर मतदारसंघात सर्वात कमी ४ उमेदवार आहेत.
२०१३ मध्ये ७१ महिला रिंगणात होत्या यावेळी कमी म्हणजे ६३ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे २९६ उमेदवार असून त्यापैकी १८३ उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे आहेत. तब्बल १९४ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीची रंगत वाढविली आहे.
८६२ तृतीयपंथी मतदार
दिल्लीत ७३,८९,०८९ पुरुष, ५९,१९,१२७ महिला तर ८६२ तृतीयपंथी असे एकूण १,३३,०९,०७८ मतदार आहेत.
१८ ते १९ वर्षे वयोगटातील पहिलट मतदारांची संख्या २,२७,३१६ तर २० ते २९ वर्षे या युवागटातील ३६,९३,९७५ मतदार निर्णायक भूमिका बजावतील असे मानले जाते. विशेष म्हणजे शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या ३११ एवढी आहे. सर्वाधिक ३,४७,२४५ मतदार मतिया महल मतदारसंघात तर चांदणी चौकमध्ये सर्वात कमी १,१३,७७७ मतदार आहेत. ९३६९ मतदार बेघर आहेत. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ४१,०९५ टपाल मतपत्रिकांचा वापर झाला यावेळी ही संख्या ४३,२३५ असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्ट्रॉँगरुमसाठी चोख सुरक्षा
१४ ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा असेल.
१६ हजार कंट्रोल युनिट २० हजार बॅलट युनिटवर १२०० मायक्रो आॅबझर्व्हर निगराणी ठेवून असतील. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. कंट्रोल रुमद्वारे लाईव्ह वेबकास्टिंग केले जाईल.