राज्यसभा उपसभापती निवडणुकीत काँग्रेसच्या मित्र पक्षांची मते फुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 20:07 IST2018-08-09T20:07:03+5:302018-08-09T20:07:44+5:30
भाजपाच्या धुरिणांनी विविध प्रादेशिक पक्षांशी योग्य ताळमेळ जमवून मतांचे गणित कुशलतेने सोडवले आणि मोदी सरकारच्या विरोधकांचे ऐक्य हे पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

राज्यसभा उपसभापती निवडणुकीत काँग्रेसच्या मित्र पक्षांची मते फुटली
नवी दिल्ली - आज झालेल्या राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार हरिवंश यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसकडून उभे असलेले विरोधी उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांचा 125 विरुद्ध 105 अशा फरकाने पराभव केला. एकीकडे काँग्रेसने एनडीएच्या उमेदवाराला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या धुरिणांनी विविध प्रादेशिक पक्षांशी योग्य ताळमेळ जमवून मतांचे गणित कुशलतेने सोडवले आणि मोदी सरकारच्या विरोधकांचे ऐक्य हे पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. तसेच काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या काही सदस्यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात मतदान केले.
काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलचे खासदार राम जेठमलानी यांनी पक्षादेश धुडकावून एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले. राम जेठमलानी हे याआधी भाजपाकडून खासदार होते. मात्र पक्षाविरोधात विधान केल्याने त्यांची भाजपातून हकालपट्टी झाली होती. नंतर 2016 साली लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल पक्षाकडून राज्यसभेवर पाठवले.
दुसरीकडे आम आदमी पक्षाने देखील काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचे टाळले होते. तर टीआरएस, बीजेडी आणि अन्य प्रादेशिक पक्षांनाही आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला अपयश आले होते.