‘व्होट चोरी’ हे सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी कृत्य : राहुल; निवडणूक सुधारणांवर चर्चा, ...तर निवडणूक आयुक्तांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:36 IST2025-12-10T09:35:17+5:302025-12-10T09:36:26+5:30
भाजप आणि संघ परिवाराने निवडणूक आयोगावर ताबा मिळवून भारताची संकल्पनाच नष्ट केली असून, अनेक घटनात्मक संस्थांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश असल्याचे ते म्हणाले.

‘व्होट चोरी’ हे सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी कृत्य : राहुल; निवडणूक सुधारणांवर चर्चा, ...तर निवडणूक आयुक्तांवर कारवाई
नवी दिल्ली : ‘व्होट चोरी’ हे सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी कृत्य असून, यात भाजप सामील असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. निवडणूक सुधारणांवरच्या आपल्या दीर्घ भाषणात राहुल गांधी यांनी भाजपबरोबर संघ परिवारावरही निशाणा साधला.
भाजप आणि संघ परिवाराने निवडणूक आयोगावर ताबा मिळवून भारताची संकल्पनाच नष्ट केली असून, अनेक घटनात्मक संस्थांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश असल्याचे ते म्हणाले. राहुल यांनी २०२३च्या निवडणूकविषयक कायद्याचा उल्लेख करत काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास या कायद्यात पुन्हा पूर्वीच्या तरतुदी केल्या जातील आणि निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार
आम्ही तज्ज्ञांना एकदा तरी ईव्हीएम पाहण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकीय पक्षांना मतदार यादी उपलब्ध करून द्या
भाषणात राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वी एक महिना सर्व राजकीय पक्षांना मशीनवर वाचता येईल अशी मतदारयादी उपलब्ध करून दिली पाहिजे, मतदानावेळीचे सीसीटीव्ही फुटेज दिले पाहिजे, तसेच व्होटिंग मशीनच्या रचनेविषयी माहिती दिली गेली पाहिजे, अशाही सूचना केल्या.
हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्रासह काही राज्यांत विधानसभा निवडणुकीत घोटाळे झाले. 'व्होट चोरी' सर्वोच्च गुन्हा असून या अशा चोरीने आधुनिक भारत उद्ध्वस्त केला जात जातो. भारताची संकल्पना नष्ट केली जाते, असे ते म्हणाले.
निवडणूक आयुक्तांची निवड पारदर्शी हवी
राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या पॅनेलवरून सरन्यायाधीशांना हटवण्याच्या सरकारच्या निर्णयावरही नापसंती व्यक्त केली. आपला सरन्यायाधीशांवर विश्वास नाही का, असा सवाल करत आमचा त्यांच्यावर विश्वास आहे; पण सरकारला ते अडचणीचे ठरतात. त्यांना पॅनेलवरून हटवण्यामागील सरकारचा उद्देश काय आहे, असा सवाल त्यांनी भाजपच्या सदस्यांकडे पाहत केला.
‘वंदे मातरम्’ अनिवार्य करा!
‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायन प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये अनिवार्य करण्याची विनंती राज्यसभेतील खासदार सुधा मूर्ती यांनी केंद्र सरकारला केली आहे. या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहात सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना मूर्ती म्हणाल्या, हे गीत मातृभूमीची संकल्पना आहे.