मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 08:23 IST2025-09-14T08:23:05+5:302025-09-14T08:23:36+5:30
हा भाग आता बनतोय देशाच्या प्रगतीचे इंजिन, मिझोरामची अॅक्ट ईस्ट धोरणात महत्त्वाची भूमिका

मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
एझॉल : पूर्वी मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताने खूप त्रास सहन केला. मात्र आता केंद्रातील भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे हा भाग देशाच्या विकासाचे इंजिन बनत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा मिझोरामचा दुसरा दौरा आहे. त्यांनी या राज्यातील ९,००० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.
लेंगपुई विमानतळावरून व्हर्चुअल माध्यमातून जाहीर सभेत भाषण केले. जोरदार पावसामुळे ते सभास्थानी म्हणजे लमुआल मैदा येथे पोहोचू शकले नाहीत. मोदींनी ऐझॉल आणि दिल्ली यांना जोडणाऱ्या पहिल्या राजधानी एक्स्प्रेसचे उद्घाटन केले. ते म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी खूप काळ मतपेढीचे राजकारण केले. त्यांच्या या वृत्तीमुळे संपूर्ण ईशान्य भारत त्रासला होता. पण आमच्या सरकारचा दृष्टिकोन वेगळा आहे. मागील ११ वर्षापासून आम्ही ईशान्य भारताच्या विकासासाठी काम करत आहोत, आणि हा भाग भारताच्या विकासाचे इंजिन बनत आहे.
'देर आए पर दुरुस्त नहीं आए' : काँग्रेस
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावर काँग्रेसने शनिवारी तीव्र शब्दांत टीका केली. हिंसाचाराला ८६४ दिवस उलटून गेल्यानंतर केवळ काही तासांसाठी राज्यात जाणे हा 'आत्मप्रशंसेचा दिखावा' असून पिडीत जनतेचा घोर अपमान असा काँग्रेसने आरोप केला.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलेली महत्त्वाची विधाने
१ जीएसटी सुधारणांमुळे अनेक वस्तूंवर कर कमी झाला असून, त्यामुळे जीवनमान सोपे होणार आहे.
स्वयंपूर्णता, उत्पादन वाढ आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्रांचे योगदान महत्त्वाचे आहे.
आर्थिक वाढ : २०२५-२६च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने ७.८% 3 वाढ नोंदविली आहे, जी जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थेपैकी सर्वाधिक आहे.
४ एझॉल बायपास रोड, थेंझॉल-सियालसुक रोड, खानकॉन-रोंगुरा रोड यांसारख्या अनेक रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
इम्फाळ : मणिपूरच्या डोंगराळ भागातील
व खोऱ्यातील लोकांमध्ये विश्वासाचा मजबूत पूल उभारणे अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. इम्फाळमधील कांगला किल्ला संकुलात आयोजिलेल्या सभेत ते म्हणाले की, मणिपूरमध्ये लोकांची मने जोडली जावीत, तिथे विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार कार्यरत आहे. येथे झालेली हिंसा निंदनीय, दुर्दैवी आहे. अशा गोष्टींमुळे आपल्या भावी पिढ्यांवरही अन्याय होणार आहे.
भारतरत्न पुरस्कार विजेतेभूपेन हजारिका यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आसामची राजधानी गुवाहाटी येथे शनिवारी आदरांजली वाहिली. तसेच भूपेन हजारिका यांच्यावर जारी करण्यात आलेल्या १०० रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण केले.
मणिपूरमधील इम्फाळमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांपैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या लोकांना भेटल्यानंतर मणिपूरमध्ये नवी आशा, विश्वासाची पहाट उगवत आहे याची मला जाणीव झाली असे ते म्हणाले.