महाराष्ट्राचा आवाज घुमला!
By Admin | Updated: December 16, 2014 04:50 IST2014-12-16T04:50:16+5:302014-12-16T04:50:16+5:30
महाराष्ट्राच्या पाच महत्त्वपूर्ण प्रश्नांनी लोकसभेचे लक्ष सोमवारी वेधून घेतले. दुष्काळावर उत्तर शोधत असतानाच, राज्यातील काही भागांत पडलेल्या गारांनी फळबागांचे अपरिमित नुकसान केले

महाराष्ट्राचा आवाज घुमला!
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पाच महत्त्वपूर्ण प्रश्नांनी लोकसभेचे लक्ष सोमवारी वेधून घेतले. दुष्काळावर उत्तर शोधत असतानाच, राज्यातील काही भागांत पडलेल्या गारांनी फळबागांचे अपरिमित नुकसान केले. तेथील शेतकऱ्यांना मदत करा, विदर्भातील युवकांना उद्योग सुरू करताना बँका मदत करत नाहीत, मुंबईतील जीर्ण झालेल्या इमारतींचे पुनर्वसन करा आणि सेवाग्रामच्या बापू कुटीचे अस्तित्व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. प्रश्नोत्तराच्या तासात व शून्यकाळातील या प्रश्नांनी राज्याच्या स्थितीवर प्रकाश पडल्याचे दिसून आले.
पीक नुकसानीकडे वेधले लक्ष
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाणसह अनेक भागांत गेल्या आठवड्यात दोन दिवस सलग बेमोसमी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढल्याने हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून मदत देण्याचे जाहीर केले. राज्य सरकारने अहवाल पाठविला आहे़ त्यामुळे केंद्राने लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी शून्यप्रहरात केली. शिवसेना खासदारांनी या मागणीस समर्थन दिले.
बँकांचा असहकार
विदर्भातील अनेक भागातील आर्थिक स्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींवर मात करून युवकांनी उद्योगासाठी बँकाकंडे कर्ज मागितले, तर त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते. दुष्काळामुळे तुम्ही कर्ज फेडू शकणार नाहीत, अशी अपमानजनक उत्तरे दिली जातात. बँका कर्ज देत नाहीत, ही मानसिकता कधी बदलली जाईल, असे शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांंनी लघुउद्योगमंत्री कलराज मिश्र यांना विचारले़ तेव्हा त्यांनी मन हेलावणारा हा विषय असून, मी यामध्ये लक्ष घालून अशा युवकांसाठी सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगात काही आर्थिक तरतूद करता येईल का, यासाठी योजना आखतो.
जीर्ण इमारतींचे पुनर्वसन करा
दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या १६ हजार जुन्या इमारतींपैकी १३ हजार ३३६ इमारती १९४० च्या पूर्वीच्या आहेत. त्यापैकी पाच हजार अतिशय जीर्ण आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकार योजना बनवीत आहे़ तेव्हा या इमारतींचा त्यामध्ये समावेश करा,अशी मागणी शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. तेव्हा शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी योजना तयार झाली की अनेक विषय त्यामध्ये अंतर्भूत करू असे म्हटले. (विशेष प्रतिनिधी)