विराट कोहली देशविरोधी, त्यांच्याकडून काय प्रेरणा घ्यायची - भाजपा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:43 IST2017-12-19T18:35:50+5:302017-12-19T18:43:36+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नासाठी इटलीची निवड केली म्हणून एका भाजपा आमदाराने विराटच्या देशभक्तीबद्दलच शंका उपस्थित केली आहे.

विराट कोहली देशविरोधी, त्यांच्याकडून काय प्रेरणा घ्यायची - भाजपा आमदार
गुना - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नासाठी इटलीची निवड केली म्हणून एका भाजपा आमदाराने विराटच्या देशभक्तीबद्दलच शंका उपस्थित केली आहे. विराटने इटलीमध्ये लग्न केले त्यामुळे तो देशभक्त नाही. विराटने भारतात नाव आणि पैसे कमावला पण त्याने इटलीमध्ये लग्न केले. भगवान राम, भगवान कृष्ण यांनी भारतामध्ये लग्न केले पण विराटने लग्न इटलीत जाऊन केले. तो राष्ट्र भक्त असू शकत नाही असे भाजपा आमदार पन्ना लाल शाक्या म्हणाले. मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
कोहलीकडून कशी प्रेरणा घेणार, जे देशाप्रती एकनिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो. अनुष्का शर्माला सुद्धा हीच बाब लागू पडते असे शाक्या म्हणाले. इटलीच्या नृत्यांगना भारतात येऊन करोडपती-अब्जोपती होतात. तेच कोहली देशाचा पैसा बाहेर घेऊन गेला. 12 डिसेंबरला इटलीच्या बोर्गो फिनोचितो हॉटेलमध्ये विराट-अनुष्का दोघे विवाहबद्ध झाले. या लग्नाला दोन्ही कुटुंब आणि ठराविक मित्र परिवार उपस्थित होता.
थेट विराट कोहलीला टार्गेट करणे हा गुजरात निवडणूक निकालाचा परिणाम आहे अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षात असलेल्या काँग्रेसने व्यक्त केली.
जाणून घ्या विराटच्या विवाहाबद्दल
विराटचा इटलीच्या ज्या बोर्गो फिनोचितो हॉटेलमध्ये विवाह झाला. ते हॉटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचं हॉटेल म्हणूनही ओळखलं जातं. जगातल्या 20 महागड्या हॉटेल्सपैकी ते एक आहे. नवी दिल्लीत 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन होणार आहे तर मुंबईत 26 डिसेंबर रोजी दोघांच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन असणार आहे.
''आज आम्ही एकमेकांसोबत कायमस्वरूपी प्रेमबंधनात अडकण्याचं आश्वासन घेतलं....हे वृत्त तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून खूप आनंद होतोय... हा दिवस कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी आणखी खास होईल...आमच्या जीवन प्रवासातील महत्वाचा हिस्सा राहिल्याबद्दल सर्वांचे आभार'' असं ट्विट दोघांनी केलं होतं'