निसर्ग ही माणसासाठीची सर्वांत मोठी देणगी असली, तरी त्याचं रूप कधी सौंदर्याचं, तर कधी विनाशाचं असतं. बिहारच्या गया जिल्ह्यातील प्रसिद्ध लंगुरही धबधब्याजवळ घडलेली ही घटना याचे जिवंत उदाहरण ठरली आहे. या ठिकाणी असलेल्या धबधब्याजवळ काही तरुण आणि तरुणी पावसाचा आनंद घेत होते, हास्य-विनोद करत फोटो-व्हिडीओ टिपत होते. मात्र, तेच क्षण काही सेकंदात शोकांतिका ठरले.
काय घडलं नेमकं?पावसाळ्यात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे अचानक धबधब्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. पाण्याचा जोर इतका होता की, ६ तरुण त्या प्रवाहात अडकले आणि बघताबघता पाण्यात बुडाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकीकडे त्या तरुणांच्या आरडाओरडांचे आवाज ऐकू येतात, तर दुसरीकडे उपस्थित लोकांचा टाहो ऐकू येत आहे.
आनंदी क्षणांचे दुःखांत रूपांतरया घटनेत जे घडलं, ते इतकं अचानकच होतं की मदतीसाठी कोणालाही वेळ मिळाला नाही. काही सेकंदांपूर्वी जे चेहरे हसत होते, तेच पुढच्या क्षणी पाण्यात बेपत्ता झाले. निसर्गाशी खेळण्याचा मोह अनेकदा माणसाच्या जीवावर बेततो, ही गोष्ट या घटनेनं पुन्हा एकदा ठळकपणे समोर आणली आहे.
आज समाजात 'थ्रिल'चा ट्रेंड वाढत आहे. सोशल मीडियावर फोटोज् आणि रील्ससाठी लोक जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जातात. पण, निसर्ग कोणत्याही क्षणी स्वतःचं रूप बदलू शकतो. पावसाळ्यात विशेषतः धबधबे, नद्या आणि डोंगराळ भागात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनानेही अशा भागांमध्ये योग्य सूचना फलक, सुरक्षारक्षक, आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
नेटकरी काय म्हणाले?व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी शोक व्यक्त केला आहे. काहींनी लिहिलं की, “प्रकृतीसोबत खेळण्याचा हा परिणाम आहे.” तर, काहींनी प्रशासनाला दोष दिला की, अशा धोकादायक ठिकाणी लोक पोहचू कसे शकले.