सोशल मीडियावर फोटो व्हायरल; सिक्कीममध्ये चीननं भारतीय जवानांवर हल्ला केल्याचा दावा
चीनच्या रॉकेट हल्ल्यात भारताच्या १५८ जवानांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य
नवी दिल्ली: लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातला तणाव वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियामध्ये एक फोटो व्हायरल झाला आहे. चिनी सैन्यानं सिक्कीममध्ये भारतीय जवानांवर रॉकेट हल्ला केल्याचा दावा यामध्ये केला जात आहे. यामध्ये भारताचे १५८ जवान शहीद झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.उत्तर सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये चीन आणि भारताच्या जवानांमध्ये खडाखडी, सिक्कीममध्ये चीननं रॉकेट लॉन्चरनं केलेल्या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलातल्या १५८ जणांचा मृत्यू अशा शीर्षकांसह सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाले आहेत. भारतीय माध्यमं ही बातमी लपवत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. लोकमतनं या फोटोची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सोशल मीडियावर करण्यात येणारा दावा खोटा असल्याचं आढळून आलं. हा फोटो आत्ताचा नाही. तो तीन वर्षे जुना आहे. सिक्कीममध्ये चीननं भारतीय सैन्यावर कोणताही रॉकेट हल्ला केलेला नाही. रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून आम्ही व्हायरल फोटो नेमका कधीचा आहे, याबद्दलचा शोध घेतला. सध्या व्हायरल झालेला फोटो आणि त्यासारखेच आणखी काही फोटो जुलै २०१७ पासून पाकिस्तान आणि चीनच्या माध्यमांनी वापरले आहेत. २०१७ मध्ये डोक्लाममध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यावेळीही पाकिस्तानमधल्या काही प्रसारमाध्यमांनी हाच फोटो वापरून चीनच्या हल्ल्यात १५८ भारतीय जवान मारले गेल्याचा दावा केला होता. त्यावेळी भारत आणि चीननं पाकिस्तानी माध्यमांनी दिलेलं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. व्हायरल फोटोंचा डोक्लामशी कोणताही संबंध नाही, हे त्यावेळीच भारतानं स्पष्ट केलं होतं. मे २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये मोर्टारचा स्फोट झाला होता. लष्करी तळावर झालेल्या स्फोटात एका जवानाचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. लष्करातल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता व्हायरल झालेले फोटो हे त्याच अपघाताचे आहेत.