ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता; अनेक शेतकरी नेते भूमिगत
By बाळकृष्ण परब | Updated: January 26, 2021 23:57 IST2021-01-26T23:57:28+5:302021-01-26T23:57:40+5:30
Violence at tractor rally Update : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. या हिंसाचाराची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता आहे.

ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता; अनेक शेतकरी नेते भूमिगत
नवी दिल्ली - केंद्र सरकाराने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. काही आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक देत तेथील ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता. दरम्यान, या हिंसक आंदोलनानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. या हिंसाचाराची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता आहे.
ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहसचिवांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून रात्री उशिरा मोठी कारवाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. या हिंसक आंदोलनानंतर अनेक शेतकरी नेते रडारवर असून, सिंघू बॉर्डरवरसुद्धा ट्रॅक्टर मोर्चानंतर अनेक प्रमुख शेतकरी नेते दिसून आळेले नाहीत.
दिल्ली पोलिसांनीही शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन हे उग्र आणि हिंसक असल्याचे म्हटले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांसह सुमारे ८३ पोलीस या हिंसाचारात जखमी झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन केंद्र सरकारने खबरदारी म्हणून निमलष्करी दल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय राजधानीच्या क्षेत्रात शांतता कायम राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त केंद्रीय बलांची तैनाती करण्यात येणार आहे. तर दिल्ली नजिकच्या हरियाणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या आदेशांनुसार सोनीपत, पलवल आणि झज्जर जिल्ह्यांमध्ये अफवांना रोखण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सेवांना स्थगिती दिली जाईल.