मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, कामावरून घरी परतत असलेल्या बिहारमधील २ मजुरांची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 08:21 IST2024-12-15T08:20:44+5:302024-12-15T08:21:58+5:30
मणिपूरमध्ये बिहारमधील दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास घडली.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, कामावरून घरी परतत असलेल्या बिहारमधील २ मजुरांची गोळ्या झाडून हत्या
गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे, अजूनही हिंसाचार थांबत नाही. काल शनिवारी सायंकाळी बिहारमधील दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना ककचिंग जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही स्थलांतरित मजुरांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मजूर ककचिंग जिल्ह्यातील केरक येथे बांधकाम करून परतत होते. ही घटना पंचायत कार्यालयाजवळ घडल्याचे ककचिंग पोलिसांनी सांगितले आहे. सुनालाल कुमार (१८) आणि मोहन सानी यांचा मुलगा दशरथ कुमार (१७) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही यादवपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोपालगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र
दोन्ही मजूर सायकलवरून भाड्याच्या घरात परतत होते. यादरम्यान बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही स्थानिक जीवन रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मणिपूर १९ महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. हजारो कुटुंबांना घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. मात्र मणिपूर शांत होण्याऐवजी संतप्त होत आहे.
गेल्या वर्षी ३ मे रोजी ईशान्येकडील मणिपूर राज्यात कुकी समुदायाकडून 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात येत असताना हिंसाचार उसळला होता. चुरचंदपूरच्या तोरबांग परिसरातून हा मोर्चा निघाला होता. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत होता. यावेळी कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. तेव्हापासून येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरूच आहे.