अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:56 AM2021-11-08T08:56:29+5:302021-11-08T08:56:44+5:30

भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर देण्याकरिता जय्यत पूर्वतयारी केली असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे.

A village settled by China in the disputed area near Arunachal; US Department of Defense claims | अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा

अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा

Next

नवी दिल्ली  : अरुणाचल प्रदेश व तिबेट यांच्यातील वादग्रस्त सीमा भागात चीनने एक नवे गावच वसविले आहे. त्या गावात सध्या १०० लोक राहतात असा दावा अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या वार्षिक अहवालात केला आहे. 

अमेरिकी काँग्रेसला हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. विस्तारवादी भूमिका असलेल्या चीनने तिबेट गिळंकृत केलाच व आता त्याचा डोळा भारतातील काही भागांवर आहे. त्यामुळे चीनने सीमा भागात सध्या आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. पूर्व लडाखमध्येही चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. अशा अनेक गोष्टींची या अहवालात नोंद करण्यात आली आहे.

या अहवालात म्हटले आहे की, सीमावाद सोडविण्याबाबत भारताचे मत मान्य न करता चीन आपली भूमिका पुढे रेटत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने हाती घेतलेल्या विकास प्रकल्पांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहे. वादग्रस्त ठिकाणी असलेले आपले सैन्य मागे हटविण्यास चीन दिरंगाई करीत आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून भारत व चीनमध्ये सीमातंट्यावरून तणाव वाढला आहे. 

भारतानेही केली जय्यत पूर्वतयारी

गलवानमध्ये भारत व चीनच्या सैनिकांत झालेल्या संघर्षात भारताचे वीसहून अधिक जवान शहीद झाले होते, तर चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले होते. गलवाननंतरही चीनने भारताला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडलेली नाही. भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर देण्याकरिता जय्यत पूर्वतयारी केली असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे.

चीनच्या २० लढाऊ विमानांची तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी

चीनच्या लढाऊ २० विमानांनी तैवानच्या डोंगशा बेटाच्या ईशान्येला असलेल्या हवाई संरक्षण हद्दीत घुसखोरी केली. यात १० शेनयांग जे-१६, ६ चेंगदू जे-१० विमाने आहेत.

Web Title: A village settled by China in the disputed area near Arunachal; US Department of Defense claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.