भाजपाचे ज्येष्ठ नेते मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसकडून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, काल रात्री त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. काँग्रेसने त्यांच्या घराबाहेर निदर्शने केली, त्यांच्या निवासस्थानी नेमप्लेट काळी शाई फेकली.
वादग्रस्त विधानाविरोधात काँग्रेस नेते मनोज शुक्ला त्यांच्या समर्थकांसह शाह यांच्या बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांच्या नावाच्या पाटीवर शाई फेकली. बंगल्याच्या बाहेर तिरंगाही फडकवण्यात आला. समर्थकांसह तेथे घोषणाबाजीही केली. एवढेच नाही तर घोषणाबाजीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी त्यांचा राजीनामाही मागितला.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावर मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनीही नाराजी व्यक्त केली. पटवारी म्हणाले, "भारतीय सैन्याने अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानी सैन्यातील ४०-४५ हून अधिकांचा खात्मा केला. पण मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले. आता मुख्यमंत्री मोहन यादव यांना स्पष्ट करावे लागेल की राज्य सरकार किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ या विधानाशी सहमत आहे का? आणि जर तसे नसेल तर विजय शाह यांना आत्ताच बडतर्फ करावे."
विजय शाह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाल्या. तेव्हा शाह यांनी सांगितले की, कर्नल सोफिया त्यांच्या स्वतःच्या बहिणीपेक्षा जास्त आदरणीय आहेत. जर माझ्या कोणत्याही विधानामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी १० वेळा माफी मागण्यास तयार आहे. हा व्हायरल व्हिडीओ सोमवारचा असल्याचे सांगितले जात आहे.
मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी सोमवारी इंदूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी शाह यांनी दहशतवाद्यांची बहीण म्हणून कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख केला. या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. त्यानंतर विरोधी पक्षासह सोशल मिडिया युजरनेही भाजपा नेत्याची खरडपट्टी केली.