४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:50 IST2025-07-01T12:50:24+5:302025-07-01T12:50:50+5:30

एका वृद्धाला तब्बल ६९ लाखांचं बिल आलं, तर त्याच्या शेजाऱ्यालाही ६८ लाखांचं बिल पाठवण्यात आलं. झोपडपट्टीतील गरीब मजूर कुटुंबांनाही प्रत्येकी ७ लाखांचं बिल देण्यात आलं. 

vidisha old mans health deteriorated after seeing bill of rs 68 lakh many received lakh rupee bill | ४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती

४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती

मध्य प्रदेशातील विदिशा येथे ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर ही एक नवीन समस्या बनली आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या घरातील जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले. यामुळे बिलिंगमध्ये पारदर्शकता येईल असा दावाही करण्यात आला होता, परंतु जेव्हा बिल आलं तेव्हा लोकांची झोप उडाली. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्य लोकांना लाखो रुपयांचं बिल देण्यात आलं. एका वृद्धाला तब्बल ६९ लाखांचं बिल आलं, तर त्याच्या शेजाऱ्यालाही ६८ लाखांचं बिल पाठवण्यात आलं. झोपडपट्टीतील गरीब मजूर कुटुंबांनाही प्रत्येकी ७ लाखांचं बिल देण्यात आलं. 

बिलावर १ लाखांचा दंड

६५ वर्षीय मुरारीलाल तिवारी आणि त्यांची पत्नी शहरातील होमगार्ड रोडवर राहतात. त्यांची मुलं दुसरीकडे राहतात आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करतात. मुरारीलाल तिवारी यांना ६९ लाख रुपयांचं बिल आलं आहे. मुरारीलाल म्हणतात की, घरात दोन लोक आहेत, खूप कमी वीज वापरली जाते. मीटर २१९ युनिट दाखवतं आणि बिल ६९ लाख रुपयांचं आहे. घरात कोणतीही माहिती न देता स्मार्ट मीटर बसवण्यात आलं होतं.

बिल पाहून पडले आजारी 

मुरारीलाल तिवारी यांचं बिल पाहताच ब्लड प्रेशर वाढलं, त्यांना चक्कर आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांनी ताबडतोब वीज कंपनीकडे लेखी तक्रार केली, परंतु एक महिना उलटूनही ना कोणतीही चौकशी झाली ना कोणीही त्यांच्याशी संपर्क साधला. पुढच्या वेळी बिल आल्यावर १ लाख रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. 

शेजाऱ्यांना ६८ लाख रुपयांचं बिल 

मुरारीलाल तिवारी यांचे शेजारी महेंद्र सिंह रघुवंशी यांनाही ६८ लाख रुपयांचं बिल आलं. ते जिल्हा पंचायतीत काम करतात. त्यांच्या तक्रारीवरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. वीज कंपनीने दावा केला होता की, या बिलांमुळे मीटर बिलिंगमध्ये पारदर्शकता येईल, परंतु प्रत्यक्षात १०० रुपयांच्या बिलांऐवजी लाखो रुपयांचं बिल येत आहे.

१०७ लोकांना लाखो रुपयांचं बिल 

मिळालेल्या माहितीनुसार, वीज कंपनीने संपूर्ण शहरात ७ हजार स्मार्ट मीटर बसवले आहेत. त्यापैकी १०७ वीज ग्राहकांच्या बिलांमध्ये चूक झाली आहे. यापैकी बरेच लोक मजूर म्हणून काम करून कुटुंब चालवतात, यापैकी काहींच्या घरात फक्त पंखा आणि बल्ब आहे. तरीही लाखो रुपयांचं बिल आलं आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

झोन-२ वीज कंपनीचे अधिकारी शरद महोबिया म्हणाले की, ज्या बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या लवकरच दुरुस्त केल्या जात आहेत. स्मार्ट मीटर बसवण्याचं काम वीज कंपनीने एका खासगी कंपनीला सोपवलं होतं. मीटर बसवल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रीडिंग घेण्यात चूक केली, ज्यामुळे बिल चुकीचं आलं आहे. 

Web Title: vidisha old mans health deteriorated after seeing bill of rs 68 lakh many received lakh rupee bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.