हत्या केल्यानंतर व्हिडीओ शूट करत दिली कबुली
By Admin | Updated: May 29, 2017 14:55 IST2017-05-29T14:55:29+5:302017-05-29T14:55:29+5:30
पंजाबमधील किला रायपूर येथे एका तरुणाने 40 वर्षीय महिलेची भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

हत्या केल्यानंतर व्हिडीओ शूट करत दिली कबुली
>ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. 29 - पंजाबमधील किला रायपूर येथे एका तरुणाने 40 वर्षीय महिलेची भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी जेव्हा सरबजित कौर आपल्या घराकडे जात होत्या तेव्हा त्यांच्यावर हल्ला करत हत्या करण्यात आली. आरोपी मनिंदर सिंहने कु-हाडीने सरबजित कौर यांच्या छाती आणि मानेवार सपासप वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला झाला तेव्हा नेमके किती लोक त्याठिकाणी उपस्थित होते हे कळू शकलेलं नाही.
धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल फोन बाहेर काढत व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सरबजित कौर यांचा व्हिडीओ काढला आणि नंतर आपल्यावर फोकस करत आपणच हत्या केल्याचं सांगितलं. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाशेजारी उभं राहून व्हिडीओ शूट केल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
यानंतर मनिंदर सिंहने पोलिसांना फोन करुन आपण हत्या केल्याची कबुली दिली. "हत्या केल्यानंतर आरोपीने कंट्रोल रुमला फोन करुन माहिती दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी तपास केला असताना मनिंदर सिंहचं गावातील एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरु होतं, ज्याची माहिती पीडितेला होती. आपल्याला सरबजित यावरुन ब्लॅकमेल करत होती असा दावा मनिंदरने केला आहे. यामुळेच आपण हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस तपास करत आहेत.