उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ पुन्हा एकदा एका विचित्र चोरीमुळे चर्चेत आली आहे. निमित्त आहे 'राष्ट्र प्रेरणा स्थळा'चे उद्घाटन आणि त्यानंतर झालेली फुलांच्या कुंड्यांची चोरी! गुरुवारी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमती नदीच्या काठी उभारलेल्या भव्य 'राष्ट्र प्रेरणा स्थळा'चे लोकार्पण केले गेले. मात्र, हा सोहळा संपताच काही लोकांनी तिथल्या सजावटीच्या कुंड्यांवर डल्ला मारला असून, याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नेमका प्रकार काय?
अटल बिहारी वाजपेयी, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतींना समर्पित हे स्मारक सुमारे २३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. या भव्य वास्तूच्या उद्घाटनासाठी हजारो रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्यांनी परिसर सजवण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम आटोपल्यानंतर सुरक्षेचा वेढा ढिला होताच, काही अतिउत्साही नागरिकांनी या कुंड्या उचलून आपल्या गाड्यांमध्ये भरण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक उघडपणे या कुंड्या चोरताना दिसत आहेत.
'जी२०'च्या 'त्या' घटनेची आठवण ताजी
या घटनेमुळे लखनौमधील जी२० परिषदेच्या वेळच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी शहराच्या सुशोभीकरणासाठी लावलेल्या महागड्या कुंड्या एका मर्सिडीज कारमधून आलेल्या व्यक्तीने चोरल्या होत्या. नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख करत नागरिकांच्या 'सिविक सेन्स'वर भाष्य केले होते. "शहराची इभ्रत वाचवण्यासाठी आम्ही त्यावेळी फक्त सीसीटीव्ही दाखवून त्यांना सोडले होते," असे मुख्यमंत्री मजेशीर अंदाजात म्हणाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
स्मारकाचे पावित्र्य आणि लोकांची वृत्ती
ज्या नेत्यांच्या त्यागातून देशाला प्रेरणा मिळते, त्यांच्या स्मारकातून अशा प्रकारे वस्तूंची चोरी होणे, हे दुर्दैवी असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही गर्दीचा फायदा घेत काही लोकांनी हे कृत्य केले. या प्रकरणावर अद्याप प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही, मात्र व्हायरल व्हिडिओमुळे लखनौच्या 'नवाबी' आणि 'नागरी शिस्ती'वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुमारे ६५ एकरवर पसरलेले हे प्रेरणा स्थळ पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे, पण अशा घटनांमुळे स्मारकाच्या देखभालीचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले आहे.
Web Summary : After PM Modi's Lucknow event, people were caught on video stealing flowerpots meant for decoration at the newly inaugurated 'Rashtra Prerna Sthal' memorial. This incident echoes a similar theft during a G20 event, raising concerns about civic sense.
Web Summary : पीएम मोदी के लखनऊ कार्यक्रम के बाद, 'राष्ट्र प्रेरणा स्थल' स्मारक से सजावट के लिए रखे गमले चोरी करते हुए लोगों का वीडियो सामने आया। यह घटना जी20 कार्यक्रम के दौरान हुई चोरी की याद दिलाती है, जिससे नागरिक भावना पर चिंता जताई जा रही है।