पाटणा : देशातील रस्त्यांची परिस्तिती अतिशय वाईट आहे. काही ठिकाणी खूप चांगले रस्ते आहेत, तर काही ठिकाणी रस्तेच नाहीत. सध्या पावसाळा सुरू आहे, अशा परिस्थितीत रस्त्यांवरील खड्डे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, बिहारची राजधानी पाटण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. महिंद्रा कंपनीची Scorpio-N एसयुव्ही रस्त्यावर पडलेल्या खड्ड्युत बुडाली. खड्डा एवढा मोठा होता की, अख्खी गाडी त्यात सामावली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पाटण्यातील रेल्वे स्टेशनजवळ घडली. पाच प्रवासी घेऊन जात असताना गाडी भल्यामोठ्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यात गाडी पाण्यात भरलेल्या खड्ड्यात सामावलेली दिसतेय. तर, काही लोक गाडीवर चढून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना दिसतात. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला, तो रस्ता खूप खराब अवस्थेत असून, त्याकडे स्थानिक प्रशासनाने कानाडोळे केल्याचे पाहायला मिळत आहे.
जबाबदारी कोण घेणार?
या घटनेनंतर महिला ड्रायव्हर नीतू सिंह चौबेने बिहार शहरी पायाभूत सुविधा विकास महामंडळाला जबाबदार धरले. हा खड्डा 20 दिवसांपासून खुला होता, प्रवाशांना सावध करण्यासाठी कोणतीही बॅरिकेड लावलेली नव्हती. जर कोणाचा जीव गेला असता, तर जबाबदारी कोणाची असती? असा सवाल त्यांनी केला. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहरातील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.