आंध्र प्रदेशातील एका शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने स्वतःला शिक्षा केली. विजयनगरमधील जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक चिंता रमण यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर कान पकडून उठाबशा काढल्या आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये, मुख्याध्यापक शाळेच्या मैदानात असलेल्या स्टेजवर विद्यार्थ्यांसमोर उभे असल्याचं दिसत आहे. यानंतर ते एक भाषण देतात ज्यामध्ये ते स्वतःला दोष देत असलेलं पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांना शिकवण्यात आणि शिस्त लावण्यास मी अपयशी ठरलो आहे असं ते म्हणतात. शाळेचा चांगला निकाल लागावा यासाठी पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.
"आम्ही तुम्हाला मारू शकत नाही किंवा शिव्या देऊ शकत नाही. आम्हाला आमचे हात बांधून ठेवावे लागतात. आम्ही शिकवत असलो तरी, इतके कष्ट करत असलो तरी, वागण्यात, शिक्षणात, लेखनात किंवा वाचनात काहीही फरक पडत नाही. अडचण तुमच्यात आहे की आमच्यात? जर तुम्ही म्हणाल की आमच्यात आहे, तर मी तुमच्यापुढे नतमस्तक होईन आणि तुम्हाला हवे असेल तर मी कान पकडून उठाबशा काढेन" असं मुख्याध्यापकांनी म्हटलं. शब्द आणि कृती यांची सांगड घालत त्यांनी उठबशा काढायला सुरुवात केली.
चिंता रमण यांनी ५० वेळा काढल्या उठाबशा
सुरुवातीला मुलं हे सगळं पाहत राहिले आणि नंतर "सर हे करू नका, कृपया करून असं करू नका" असं ओरडू लागले. मुख्याध्यापक चिंता रमण यांनी कान पकडून जवळपास ५० वेळा उठाबशा काढल्या. त्यांच्या या कृतीचे राज्यमंत्री नारा लोकेश यांनी कौतुक केलं, त्यांनी X वर व्हिडीओ पोस्ट केला. "विजयानगरम जिल्ह्यातील बोब्बिली मंडळातील पेंटा झेडपी हायस्कूलचे मुख्याध्यापक चिंता रमण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मी पाहिला ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, मुलांची शैक्षणिक प्रगती कमी आहे आणि ते त्यांचे ऐकत नाहीत... विद्यार्थ्यांना शिक्षा न करता ते असं काहीतरी करत आहेत."
"चला आपण सर्वजण मिळून शिक्षणाचा दर्जा सुधारूया"
"जर सर्वांनी एकत्र काम केलं आणि प्रोत्साहन दिलं तर आपल्या सरकारी शाळांमधील मुलं चमत्कार करतील. त्यांना शिक्षा न करता समजून घेण्यासाठी स्वयंशिस्तीची तुमची कल्पना चांगली आहे. चला आपण सर्वजण मिळून शिक्षणाचा दर्जा सुधारूया. चला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, शारीरिक आणि मानसिक विकासासाठी काम करूया आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करूया" असं म्हटलं आहे.