Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:28 IST2026-04-06T16:27:28+5:302026-04-06T16:28:44+5:30
विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणारा चेहरा म्हणून त्या पक्षात ओळखल्या जातात.

Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
नवी दिल्ली - राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांचा आज संसदेत शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आलेल्या खासदारांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी मराठमोळ्या वेशभूषेत हातात संविधान हाती घेत राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. मात्र ही शपथ घेताना वाघमारे यांना अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवल्याचे समोर आले.
राज्यसभेत ज्योती वाघमारे या शपथ घेण्यासाठी उभ्या राहिल्या. तेव्हा त्यांच्या हातात भारताच्या संविधानाची प्रत होती. यावेळी वाघमारे यांनी शपथ वाचताना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांबमुनी महाराज, जिजाऊ, सावित्री, रमाई, माता अहिल्या यांना मानाचा मुजरा करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने ईश्वर साक्षीने शपथ घेण्यास सुरूवात केली. मात्र त्याचवेळी राज्यसभेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मध्येच थांबवले आणि त्यांना पुन्हा एकदा शपथ वाचायला सांगितली. त्यानंतर वाघमारे यांनी पुन्हा संसदेने लिहून दिलेली शपथ वाचून दाखवली.
कोण आहेत ज्योती वाघमारे?
पक्षातील अनुभवी, बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट जाहीर करून एकनाथ शिंदेंनी अनेकांना धक्का दिला. सोलापूरतून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत असताना दलित पँथरच्या माध्यमातून सामाजिक लढा जिवंत ठेवला होता. हाच वारसा घेऊन ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केली. पाच भाषांवरील प्रभुत्व आणि आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यास ही त्यांची मुख्य ओळख आहे. गेल्या अडीच वर्षांत टीव्हीवरील चर्चासत्रे असोत किंवा दसरा मेळाव्यातील भाषणे, डॉ. वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केले आहेत. विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणारा चेहरा म्हणून त्या पक्षात ओळखल्या जातात.