घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. वधूसोबत आक्रित घडलं. हळदी समारंभात नाचत असतानाच अचानक तिची तब्येत बदलली आणि ती खाली पडली. लग्नाला अवघे काही तास शिल्लक असतानाच नवरीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. बदायूंमधील इस्लामनगर पोलीस स्टेशन परिसरातील नूरपूर पिनोनी गावात ही हृदयद्रावक घटना घडली.
दीक्षा असं या मुलीचं नाव असून ती तिच्या कुटुंबात चार भावांमध्ये एकुलती एक मुलगी होती. तिने इस्लामनगरमधील डिग्री कॉलेजमधून बीएचं शिक्षण घेतलं होतं. रविवारी हळदी समारंभात ती तिच्या बहिणी आणि नातेवाईकांसोबत आनंदाने नाचताना दिसली. मग अचानक ती घाबरली आणि वॉशरूममध्ये गेली. काही मिनिटांनंतरही ती बाहेर आली नाही तेव्हा कुटुंबीयांनी दरवाजा तोडला आणि पाहिलं तर दीक्षा जमिनीवर बेशुद्ध पडली होती.
मुलीला आला हार्ट अटॅक
कुटुंबीयांनी ताबडतोब गावातील डॉक्टरांना बोलावलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दीक्षाची आई सरोज देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला उचललं तेव्हाच ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीला हार्ट अटॅक आला आहे. दीक्षा आधीच हृदयासंबंधीत आजाराने ग्रस्त होती आणि दिल्लीत तिच्यावर उपचार सुरू होते.
मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का
नवरीच्या मृत्यूची बातमी कळताच घरात गोंधळ उडाला. दीक्षाचं लग्न मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी गावातील सौरभशी ठरलं होतं, जो एका कारखान्यात काम करतो. लग्नाची वरात सोमवारी येणार होती, सर्व तयारी पूर्ण झाली होती. नातेवाईक आणि पाहुणे आधीच घरी पोहोचले होते. दीक्षाने हळदी आणि मेहंदी समारंभाचं फोटोशूट केले होते. तिने हे फोटो कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर केले होते. पण आता तिचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.