प्रवीण तोगडिया यांची विहिंपच्या कार्यकारी अध्यक्षपदावरुन होणार गच्छंती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 14:56 IST2018-04-11T14:56:34+5:302018-04-11T14:56:34+5:30
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 52 वर्षात प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे.

प्रवीण तोगडिया यांची विहिंपच्या कार्यकारी अध्यक्षपदावरुन होणार गच्छंती ?
नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 52 वर्षात प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. 14 एप्रिलला विहिंपच्या कार्यकारी बोर्डाची बैठक होणार असून त्यात तोगडिया आणि विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी यांची पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे. या दोन्ही पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विहिंपच्या या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बडे अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. संघानं विहिंपच्या अध्यक्षपदासाठी व्ही. कोकजे यांचे नाव सुचवले असून 14 एप्रिलला गुरुग्राममध्ये होणाऱ्या विहिंपच्या बैठकीत कोकजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर 2017 मध्ये तोगडिया आणि रेड्डी यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी 29 डिसेंबर 2017ला भुवनेश्वरमध्ये बैठकदेखील झाली होती. मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत कोकजे यांच्या नावाला विरोध केला होता. अलिकडेच प्रवीण तोगडिया यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांची गच्छंती अटळ असल्याचे बोलले जात आहे.