माजी सैनिकाने वाचवला बुडणाऱ्या पाच तरुणांचा जीव; अंबानींच्या अँटिलियाशी आहे संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:35 IST2025-02-11T20:30:17+5:302025-02-11T20:35:10+5:30
पंजाबमध्ये एका माजी सैनिकाने कालव्यात बुडणाऱ्या पाच तरुणांना वाचवलं आहे.

माजी सैनिकाने वाचवला बुडणाऱ्या पाच तरुणांचा जीव; अंबानींच्या अँटिलियाशी आहे संबंध
Punjab Accident: लष्करातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाने आपलं शौर्य आणि जिद्द पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. हरजिंदर सिंग या ४९ वर्षीय माजी सैनिकाने आपल्या दोन किशोरवयीन मुलांसह पाच जणांना पंजाबमध्ये एका कालव्यातून बुडताना वाचवलं. एसयूव्ही गाडी कालव्यात पडल्यानंतर पाचही जण जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हरजिंदर सिंग यांनी सर्वांना बाहेर काढलं. मात्र, एका व्यक्तीला वाचवता आले नाही. बर्फासारख्या थंड पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
लुधियाना येथे रात्रीच्या सुमारास पावत आणि बिहलोपूर गावांदरम्यान असलेल्या सिरहिंद कालव्यात ही घटना घडली. माजी लष्करी जवान हरजिंदर सिंग हे सध्या मुकेश अंबानींच्या अँटिलियाच्या सुरक्षा दलात तैनात आहेत. सध्या ते सुट्टीसाठी आपल्या घरी पटियाला येथे आले आहेत. सोमवारी ते १८ वर्षीय गुरलीनप्रीत सिंग आणि १७ वर्षीय हरकिरत सिंग या दोन मुलांसोबत गाडीने एका लग्नावरुन परतत होते. त्यावेळी त्यांना कालव्यात एक गाडी बुडत असल्याची दिसली. हा सगळा प्रकार पाहून त्यांनी गाडी थांबवली तेव्हा एसयूव्हीमधील सहा जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.
यानंतर हरजिंदर सिंग आपल्या दोन मुलांसह त्यांना वाचवण्यासाठी कालव्यात उतरले. तिघांनी मिळून गाडीच्या काचा फोडून कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. झाडांच्या तुटलेल्या फांद्या घेऊन तिघांनीही सर्वांना चिखलातून बाहेर काढलं. पिता-पुत्रांनी सर्वांना बाहेर काढून रस्त्यावर आणलं. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मात्र यातील एकाचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर स्थानिकांनी हरजिंदर सिंग यांचे कौतुक केले आहे. २००८ मध्ये हरजिंदर यांनी एका २५ वर्षांच्या मुलीलाही वाचवलं होतं. हरजिंदर सिंग यांनी मुलीला गढूळ पाण्यातून ओढत किनाऱ्यावर आणलं होतं. त्यानंतर बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल राज्य सरकारने त्यांचा गौरव केला होता. हरजिंदर हे कारगिलमध्ये जखमी झाले होते. युद्धानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी बाहेर नेण्यात आले.