१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:24 IST2025-10-26T06:24:30+5:302025-10-26T06:24:45+5:30
एसआयआरच्या पहिल्या टप्प्याची घोषणा आयोग पुढील आठवड्याच्या मध्यास करू शकते.

१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
नवी दिल्ली : निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा (एसआयआर) पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यात १० ते १५ राज्यांमध्ये ही मोहीम राबविली जाईल. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या काही राज्यांचा त्यात समावेश असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांत २०२६मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या राज्यांतील मतदार याद्यांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यास आयोग अग्रक्रम देईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसआयआरच्या पहिल्या टप्प्याची घोषणा आयोग पुढील आठवड्याच्या मध्यास करू शकते.
अवैध विदेशी स्थलांतरित वगळणार
प्रत्येक राज्यातील शेवटचा एसआयआर हा कट-ऑफ डेट म्हणून वापरला जाईल. बहुतांश राज्यांमध्ये शेवटचा एसआयआर २००२ ते २००४च्या दरम्यान झाला होता. त्या राज्यांनी मतदारांचे मॅपिंग शेवटच्या एसआयआरनुसार जवळपास पूर्ण केले आहे. विदेशी बेकायदेशीर स्थलांतरितांना मतदार यादीतून वगळणे हे एसआयआरचे मुख्य उद्दिष्ट आहे. बांगलादेश, म्यानमारसह इतर देशांतील बेकायदेशीर स्थलांतरितांची मायदेशात हकालपट्टी करणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू आहेत किंवा लवकरच होणार आहेत, त्या ठिकाणी एसआयआर प्रक्रिया सध्या होणार नाही. अशा राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात एसआयआर प्रक्रिया राबविली जाईल.