बदलत्या हवामानामुळे भाजीपाला संकटात
By Admin | Updated: May 12, 2014 18:29 IST2014-05-12T17:45:18+5:302014-05-12T18:29:07+5:30
तापमानातील होणार्या बदलांमुळे फळ आणि भाजीपाला संवर्गातील पिके धोक्यात आली आहेत.

बदलत्या हवामानामुळे भाजीपाला संकटात
पातूर : तापमानातील होणार्या बदलांमुळे फळ आणि भाजीपाला संवर्गातील पिके धोक्यात आली आहेत. टमाटर, भेंडी, काकडी, गवार, वांगी, बरबटी, आलू, कोबी, कारले या पिकांना तडाखा बसला आहे. या पिकाला लावलेला खर्चही आता निघणार की नाही, या संकटात भाजीपाला उत्पादक सापडले आहेत. पातूर तालुक्यातील आलेगाव, खामखेड, बोडखा,आगीखेड,शिर्ला यासह अनेक गावातील शेतकरी भाजीपाला पिके घेतात. भाजीपाला पिकावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबूनआहे. पातूर तालुक्यात फुलांची शेती आहे. येथून येणारी फुले हे अकोला व आजूबाजूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. बदलत्या हवामानामुळे फुलेही कोमेजत आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांवर असलेली संकटांची मालिका कायम आहे. यामध्ये सर्वच शेतकरी भरडली जात आहेत. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातील खरीप हंगाम गेला. त्यानंतर रब्बीचे पीक घरी येईल, असे वाटत असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यातूनही सावरत शेतकर्यांनी फळे व भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित केले होते; परंतु आता वातावरणातील सातत्याने होत असलेला बदल, पांढर्या माशीचा प्रकोप यामुळे फळे व भाजीपाला पीकही संकटात आले आहे. जे पीक किंवा फळे हाती येत आहे, त्याला बाजारात पाहिजे तसा भाव नाही. अत्यल्प दरात भाजीपाला व फळे व्यापार्यांना विकल्याशिवाय शेतकर्यांजवळ कोणताही मार्ग नाही. यातून व्यापारी मात्र चांगले पैसे कमवित असले तरी शेतकरी रात्रंदिवस परिश्रम करूनही रिताच आहे. या फळपिकांवरील पांढर्या माशीचा बंदोबस्त करण्यासाठी लागणारी औषधी अतिशय महागडी आहे. सध्या शेतकर्यांकडे पैसा जमा नसल्यामुळे त्यांना आपली पिके वाचविणे शक्य होताना दिसत नाही. टमाटर, भेंडी, काकडी, गवार, वांगी, बरबटी, आलू, कोबी, कारले यांसह अनेक पिके शेतकर्यांच्या शेतात आहे. ढगाळ वातावरण भाजीपाला पिकांसाठी घातक आहे. अशातच भाजीपाल्यांचे भाव गडगडले असल्यामुळे शेतकर्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.