हरिद्वारच्या ज्वालापूरमध्ये एका जोडप्याने भरधाव वेगात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनसमोर स्वतःला झोकून, आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य रस्त्यालागत असणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस लखनौवरून देहरादूनला जात होती. हा अपघात घडला त्यावेळी या ट्रेनचा वेग ताशी ९० किलोमीटर होता. ट्रेन भरधाव वेगात निघून गेल्यानंतर या जोडप्याच्या मृतदेहाचे तुकडे ट्रॅकवर आढळले.
पोलिसांनी या महिला आणि पुरुषाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश मिळू शकले नाही. दोघांच्या आत्महत्येचं कारण देखील अद्याप समजलेलं नाही. पोलीस या मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
वंदे भारत समोर मारली उडीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२३० वाजताच्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेस लखनौहून देहरादूनला जात होती. यावेळी ज्वालापूरमधील सेक्टर २ बॅरियरजवळ मुख्य रस्त्याला लागून असलेल्या रेल्वे ट्रॅकवर एक महिला आणि एक पुरूष उभे होते. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकताच पुरुष लगेच रेल्वे ट्रॅकवर झोपला. तर, ट्रेन जवळ येताच त्याच्यासोबतची महिलाही रुळावर झोपली. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. मात्र, काही कळायच्या आताच वंदे भारत ट्रेन दोघांना उडवून निघून गेली. ट्रेन गेल्यानंतर काही सेकंदातच लोकांनी रेल्वे रुळावर धाव घेतली. मात्र, दोघांच्या शरीराचे तुकडे झाले होते.
मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू
सदर घटनेची माहिती मिळताच अमरजीत सिंह, जीआरपी स्टेशन प्रमुख अनुज सिंह आणि इतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्रत्यक्षदर्शींकडून घटनेची माहिती गोळा केली. पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश मिळाले नाही. दोघांची ओळख पटवता येईल, असे कोणतेही कागदपत्रे किंवा मोबाईल फोन, आधार कार्ड इत्यादी वस्तू जवळपास आढळल्या नाहीत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवले आहेत.
या घटनेत मृत पावलेल्या जोडप्याचे वय साधारण पन्नाशीच्या आसपास असावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेवेळी ट्रेन ताशी ९० किलोमीटर वेगाने धावत असल्याने ती थांबवणे कठीण असल्याचे, वंदे भारत ट्रेनचे लोको पायलट ब्रिजमोहन मीना यांनी म्हटले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून, मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.