मध्यरात्री अचानक वंदे भारत एक्स्प्रेस थांबली, लाईट बंद झाले, आगीच्या ठिणग्या दिसल्या; प्रवाशांमध्ये पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 09:25 IST2024-03-05T09:25:03+5:302024-03-05T09:25:23+5:30
अंधारातच खडबडून जागे झालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली व जो तो ट्रेन बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला.

मध्यरात्री अचानक वंदे भारत एक्स्प्रेस थांबली, लाईट बंद झाले, आगीच्या ठिणग्या दिसल्या; प्रवाशांमध्ये पळापळ
हावडाहून पाटण्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास प्रवाशांची भितीने अचानक पळापळ सुरु झाली. मोठा आवाज होत आगीच्या ठिणग्या उडू लागल्या, यातच वंदे भारत ट्रेन थांबली आणि आतील लाईटही गेली. इमर्जन्सी आल्याने ट्रेनचे दरवाजे उघडले. या अंधारातच खडबडून जागे झालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली व जो तो ट्रेन बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला. यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
गुलजारबागच्या शीतला माता मंदिराजवळ सोमवारी रात्री सुमारे साडे बाराच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर झाड पडले. याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेस खालून जात होती. झाड पडल्याने तारा तुटल्या आणि मोठा आवाज झाला. यामुळे जोरदार ठिणग्या पडल्या आणि आग लागली. सुदैवाने ही आग वंदे भारतमध्ये पसरली नाही, परंतु चालकाने ट्रेन थांबविली व अचानक वंदे भारतच्या लाईट गेल्या.
ट्रेनला असलेले अॅटोमॅटीक दरवाजे उघडले. एव्हाना प्रवाशांच्या काहीतरी घडल्याचे लक्षात आले आणि जो तो बाहेर पडण्याच्या आकांताने धावपळ करू लागला. आतमध्ये चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. यानंतर सर्व सुरक्षित असल्याचे पाहून ज्यांचे स्टेशन जवळ आले होते त्यांनी बॅगा घेत शेजारचा फ्लायओव्हर गाठत घरी गेले. ज्या प्रवाशांना पुढे जायचे होते ते ट्रेनजवळच थांबले.
सुमारे दीड तासाने ओव्हरहेड वायरवरील झाड हटवून दुरुस्ती करून वंदे भारत पुढे मार्गस्थ करण्यात आली. आधीच ही ट्रेन अडीच तास लेट होती. एका स्थानकावर या ट्रेनला सुमारे दीड तास थांबवून ठेवण्यात आले होते. त्यातच पुन्हा हा प्रकार घडल्याने प्रवाशांना आणखी उशीर झाला.