उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीमुळे डोंगरांवरून भला मोठा चिखलाचा लोंढा आला आणि अख्खा गाव त्याखाली गाडला गेला. या घटनेच्या व्हिडीओने सर्वांनाच धडकी भरविली आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड करताना काही लोक शिट्ट्या मारत होते. अनेकांना ते मजा करत होते, असे वाटणे सहाजिक आहे. परंतू, ते मजा करत नव्हते तर ते तेथील लोकांना सावध करत होते. यासाठी आपल्याला उंच डोंगराळ प्रदेशात संकेत, इशारे कसे दिले जातात हे समजून घ्यावे लागेल.
वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. दगड वेगाने खाली येत होते. खीर गंगा नदीतून माती, दगड मोठ्या वेगाने खाली येत होते. अशातच या आवाजात पळा, बाहेर पडा असे मोठ्याने जरी ओरडला तरी ते आवाज पोहोचणे खूप कठीण असते. पहाडी भागात अशा प्रकारच्या धोक्याच्या सूचना देण्यासाठी शिट्टीचा वापर करतात. कारण ओरडण्यातून निघणाऱ्या आवाजापेक्षा शिट्टीची तीव्रता जास्त असते, यामुळे ती वाजविली जाते. तसेच शिट्टीचा आवाज डोंगरावर आदळून त्याचा प्रतिध्वनी देखील निर्माण होतो. यामुळे खूपवेळा शिट्टी वाजविली जाते. ज्याचा नाद घुमतो आणि पलिकडच्या बाजुला असलेल्यांच्याही कानावर आदळतो.
डोंगराळ भागात एकतर मोबाईलला रेंज नसते, रस्ते नसतात. या भागात पाण्याचा धोका असतो, आगीचा धोका असतो, वाघ किंवा इतर हिंस्र जंगली श्वापदे येऊ शकतात. अशावेळी ओरडण्यापेक्षा शिट्टी वाजवून सूचना दिली जाते. यामुळे लोक सावध होतात. आता या शिट्टी वाजविण्याचे देखील प्रकार असतात. धोका, सूचना आदी गोष्टी या शिट्टी वाजविण्याच्या प्रकारावरून ठरविले जातात आणि लोक सावध होतात. आजच्या जमान्यात या गोष्टी विलुप्त होत चालल्या आहेत.
आजच्या जमान्यात या गोष्टी विचित्र वाटणाऱ्या असल्या तरी देखील दुर्गम भागात याचा वापर करावा लागतो. धराली गावातील भूस्खलनाचा व्हिडीओ काढणारे लोकही तेच करत होते. परंतू, सोशल मीडियावर व्हिडीओ पाहताना ते शिट्टी वाजवत असल्याचे पाहून अनेकांनी यावर टीका केली होती.