उत्तराखंडच्या पर्यटनाला मोठ्या संधी; राज्यपाल बेबी राणी मौर्या यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:05 IST2019-12-14T03:36:23+5:302019-12-14T06:05:16+5:30
उत्तराखंडमध्ये गुंतवणूकदार आले तर निश्चित स्वरूपात या राज्याला खूप लाभ मिळेल.

उत्तराखंडच्या पर्यटनाला मोठ्या संधी; राज्यपाल बेबी राणी मौर्या यांचे मत
डेहराडून : उत्तराखंडात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. जर येथे गुंतवणूकदार आले तर राज्य वेगाने विकसित होईल, असे मत उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्या यांनी व्यक्त केले.
‘लोकमत एडिटोरियल बोर्डा’चे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्याशी झालेल्या चर्चेत राज्यपाल बेबी राणी मौर्या म्हणाल्या की, उत्तराखंड देवभूमी आहे. येथे देवतांचा वास आहे. येथील नागरिक अत्यंत मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ आहेत. उत्तराखंडचे लोक देश आणि विदेशात अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांवर सेवा देत आहेत. शिक्षणक्षेत्रातही येथे चांगले काम सुरू आहे. पर्यटनाच्या खूप संधी आहेत. जर उत्तराखंडमध्ये गुंतवणूकदार आले तर निश्चित स्वरूपात या राज्याला खूप लाभ मिळेल.
या चर्चेदरम्यान विजय दर्डा यांनी त्यांना ‘लोकमत सखी मंच’बाबत माहिती दिली. राज्यपालांनी सखी मंचच्या कार्याची स्तुती करीत म्हटले की, ‘लोकमत’तर चांगले काम करतच आहे; पण महिलांचा सर्वांगीण विकास आणि सशक्तीकरणासाठी ‘लोकमत’ समूहाने आणखी चांगले काम करायला हवे.
बेबी राणी मौर्या म्हणाल्या की, आपण सखी मंचच्या कार्यक्रमास कधी अवश्य येऊ. राज्यपाल मौर्या यांनी महाराष्ट्राचीही स्तुती केली आणि म्हटले की, महाराष्ट्र चांगले प्रगतिशील राज्य आहे.