उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली . डॉक्टर बनण्याच्या जिद्दीतून एका विद्यार्थ्याने चक्क स्वतःच्या पायाचा बोट कापून घेतला. या कृत्यामुळे आता त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
सूरज भास्कर (वय, २४) असे संबंधित तरुणाचे नाव असून तो जौनपूर जिल्ह्यातील लाईन बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खलीलपूर गावातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी सूरजचा भाऊ आकाशने पोलिसांत तक्रार दिली होती की, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरून सूरजला बेदम मारहाण केली आणि त्याच्या पायाचे बोट कापून टाकले. या तक्रारीमुळे परिसरात एकच खळबळ माजली.
घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष श्रीवास्तव यांनी शहर क्षेत्राचे सीओ गोल्डी गुप्ता यांच्याकडे तपास सोपवला. मात्र, तपासादरम्यान सूरजने दिलेल्या जबाबांमध्ये पोलिसांना अनेक विसंगती आणि विरोधाभास जाणवले. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले. सूरजच्या मोबाईलमध्ये एका तरुणीसोबतचे संभाषण सापडले. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला. सर्वात महत्त्वाचा सुगावा सूरजच्या डायरीत सापडला. त्याने डायरीत मी २०२६ मध्ये एमबीबीएस डॉक्टर होईल असे लिहून ठेवले होते.
पोलीस तपासांत धक्कादायक माहिती उघड
याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता समोर आले की, सूरज दोनदा नीट परीक्षेत नापास झाला होता. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळण्याची खात्री नसल्याने त्याने अपंग कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळवण्यासाठी स्वत:च्या पायाचे बोट कापून घेतले आणि हे कृत्य अज्ञातांनी केल्याचा बनाव रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सूरजवर रुग्णालयात उपचार सुरू
लाईन बाजार पोलीस स्टेशनचे प्रभारी सतीश सिंह यांनी सांगितले की, सूरजवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्याने केलेल्या या कृत्यामुळे आता त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.