अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे कौतुक करताना चीन-पाकिस्तानला सुनावले खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 21:12 IST2017-10-18T21:11:16+5:302017-10-18T21:12:02+5:30
दक्षिण आशियाच्या दौ-यावर येण्याआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे कौतुक करताना चीन-पाकिस्तानला सुनावले खडे बोल
वॉशिंग्टन - दक्षिण आशियाच्या दौ-यावर येण्याआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केले आहे. भारताचे कौतुक करताना टिलरसन यांनी चीन आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानातील दहशतवादी तिथल्या जनतेसाठी आणि शेजारी देशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या भूमीतून चालणा-या दहशतवादाविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे. आम्हाला पाकिस्तानकडून तशी अपेक्षा आहे असे टिलरसन म्हणाले.
भारताबरोबर द्विपक्षीय संबंध दृढ करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच त्यांनी चीनवरही सडकून टीका केली. दक्षिण चीनच्या समुद्रात चीन चिथावणीखोर वर्तन करुन आंतरराष्ट्रीय कायदे, नियमांना आव्हान देत आहे असे टिलरसन म्हणाले.
पुढच्या शतकातील भारत-अमेरिका संबंध या विषयावर त्यांनी सेंटर फॉर स्ट्रॅटजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये भाषण केले. अमेरिका आणि भारत सुरक्षा, मुक्त व्यापार आणि दहशतवादाविरोधात लढाई या उद्दिष्टयांवर एकत्र काम करत आहे असे त्यांनी सांगितले.