लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना कर्नाटकातील भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याने लोकसभेत सोमवारी गदारोळ झाला.
राहुल गांधी यांनी अभिभाषणावर बोलण्याआधी तेजस्वी सूर्या यांनी केलेल्या आरोपाला आपल्याला उत्तर द्यायचे आहे, असे सांगत थेट भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या २०२० मधील भारत-चीन संघर्षावरील एका अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचण्यास सुरुवात केली. त्याने गोंधळ सुरू झाला. त्यावर राहुल गांधी यांनी आपण एका मासिकात प्रसिद्ध झालेले नरवणे यांच्या पुस्तकाचे उतारे सभागृहापुढे ठेवत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
यावर राहुल गांधी एखाद्या अप्रकाशित पुस्तकाचा कसा दाखला देऊ शकतात, असे प्रत्युत्तर देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप सदस्यांकडून तीव्र विरोध झाला. त्यावर सभागृहात ५० मिनिटे गोंधळ सुरू होता आणि अखेर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
या गदारोळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही हस्तक्षेप करत राहुल गांधी अप्रकाशित पुस्तकाचा भाषणात संदर्भ देऊ शकत नाही. त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच बोलावे, असे अनेकवेळा सांगत राहुल गांधी यांना बोलण्यास परवानगी नाकारली. मात्र, राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या बाजूने विरोधी पक्षातील अनेक नेतेही उभे राहिले. परिणामी, सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
संसद स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, चीनचे सैनिक पुढे सरकत असताना ‘५६ इंचाची छाती’ कुठे होती, हे देशाला कळेल, या भीतीपोटी राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर बोलू दिले जात नाही. नरवणे यांच्या पुस्तकातील मजकूर देशासमोर आला तर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांची खरी भूमिका उघड होईल. हे सरकार फक्त एका ओळीला घाबरत असून, आपण संसदेत परत बोलणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. आपण आसनाचा अवमान करत नसून राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा करू इच्छितो, असे ते म्हणाले.
विरोधकांचा पाठिंबा
राहुल गांधी यांच्या बाजूने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा आणि कल्याण बॅनर्जी, राजदचे मनोज झा यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उभे राहिले.
लोकसभा अध्यक्षांची भूमिका
सभागृहाच्या कार्यवाहीशी संबंधित नसलेल्या विषयांवर पुस्तके किंवा वृत्तपत्रातील उतारे उद्धृत करता येत नाहीत, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार स्पष्ट केले.
भाजपचे आक्षेप संसदीय कामकाज मंत्री व भाजपचे खासदार किरेन रिजीजू यांनी राहुल गांधी यांना लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे पालन करावे लागेल, अन्यथा सभागृहाला कारवाईचा विचार करावा लागेल, असा इशारा दिला.
Web Summary : Rahul Gandhi's attempt to counter BJP's nationalism questioning using General Naravane's book excerpts sparked uproar in Lok Sabha. Disagreement over referencing unpublished material led to repeated adjournments. Rahul accused the government of suppressing discussion on national security.
Web Summary : राहुल गांधी द्वारा जनरल नरवणे की किताब के अंशों का उपयोग करके भाजपा के राष्ट्रवाद पर सवाल उठाने के प्रयास से लोकसभा में हंगामा मच गया। अप्रकाशित सामग्री का उल्लेख करने पर असहमति के कारण बार-बार स्थगन हुआ। राहुल ने सरकार पर राष्ट्रीय सुरक्षा पर चर्चा को दबाने का आरोप लगाया।