उत्तर प्रदेशातील बरेली येथे अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे दोन आरोपी चकमकीत (एन्काउंटर) ठार झाले आहेत. रविंद्र (रोहतक) आणि अरुण (सोनीपत), अशी या दोन्ही आरोपींची ओळख आहे. यूपी एसटीएफच्या कारवाईत आज बुधवारी (17 सप्टेंबर) गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी येथे या आरोपींचे एन्काउंटर झाले. मृत शूटर रविंद्र हा रोहतकचा, तर अरुण सोनीपतचा रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचे रोहित गोदारा-गोल्डी बरार टोळीशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. एसटीएफच्या पथकाने घटनास्थळावरून ग्लॉक, जिगाना पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. दरम्यान, 12 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास बरेलीच्या सिव्हिल लाइन्स परिसरात दिशा पाटनीच्या घरावर दोन अज्ञात बाइकस्वार गुंडांनी 8-10 राऊंड गोळीबार केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह गोळीबार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला होता, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाव्हती.
दिशाच्या वडिलांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद - या घटनेनंतर, दिशा पाटनीचे वडील जगदीश सिंह पाटनी (निवृत्त डीएसपी) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी त्यांना संपूर्ण सुरक्षेची खात्री दिली होती आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ खुलासा आणि कारवाईचे निर्देश दिले होते.
अशी पटवली गुन्हेगारांची ओळख -बरेलीमध्ये 12 सप्टेंबरच्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दिशा पाटनीच्या घरावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयास्पद मार्गांची तपासणी केली. याच बरोबर, शेजारील राज्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डशी तुलना करून या दोन्ही गुन्हेगांची ओळख पटली. तपासादरम्यान, रविंद्र हा रोहतकचा तर अरुण हा सोनीपतचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दोन्ही गुन्हेगार या घटनेत सामील होते.