UP News: वाराणसीतील IIT-BHU मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. एमटेकचा विद्यार्थी अनुप सिंग चौहान याचा मृतदेह त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत आढळला. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमटेकचा विद्यार्थी असलेला अनुप सिंग चौहान याची बुधवारी सकाळी परीक्षा होती. मंगळवारी रात्री तो त्याच्या दोन मित्रांसह खोलीत अभ्यास करत होता. तिघांनी पहाटे ३ वाजेपर्यंत अभ्यास केला आणि नंतर झोपी गेले. सकाळी ६ वाजता मित्रांनी अनुपला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठलाच नाही. अनुपचे शरीर थोडे गरम होते. विद्यार्थ्यांनी त्याला सीपीआरदेखील दिला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
मित्र्यांनी तातडीने आयआयटी प्रशासनाला याची माहिती दिली. अनुपला बीएचयूच्या सर सुंदर लाल रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून अनुपला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने अनुपचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. सकाळी ७:३० वाजता आयआयटी-बीएचयूकडून अनूपच्या कुटुंबाला मृत्यूची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. मृत अनूप सिंग चौहान आझमगडचे रहिवासी होता. त्याचे वडील व्यवसायाने वकील आहेत. या प्रकरणात वडिलांनी कोणालाही आरोपी केलेले नाही.