UP News: उत्तर प्रदेशातील लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका डॉक्टरची रस्त्यावरुन जाणाऱ्या घोड्याला दोरदार धडक बसली. या घटनेत डॉक्टरसह घोड्याचाही जागीच मृत्यू झाला. तसेच, दुचाकीवर बसलेल्या मुलगा जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा हरदोई रोडवरील रहिमाबादच्या जिंदौर भागात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी डॉक्टरने हेल्मेट घातले नव्हते, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. डॉ. नवल किशोर(52) असे या डॉक्टरचे नाव असून, त्यांचे लोधाई परिसरात क्लिनिक होते. सोमवारी रात्री ते आपल्या मुलासोबत गढी जिंदौर येथील एका ढाब्यावर जेवायला गेले होते. परत येत असताना त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावर आलेल्या घोड्याला धडकली.
यात डॉ. नवल किशोर आणि त्यांचा मुलगा रस्त्यावर पडले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. माहिती मिळताच, रहिमाबादचे निरीक्षक आनंद कुमार द्विवेदी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना सीएचसी मलिहाबाद येथे पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी डॉ. नवल किशोर यांना मृत घोषित केले. मुलाची गंभीर प्रकृती पाहून त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले.