ॅशिवाजी विद्यापीठातील निवडणुकीचा वाद रंगला
By Admin | Updated: August 23, 2014 00:08 IST2014-08-22T23:32:35+5:302014-08-23T00:08:53+5:30
निवेदन, पत्रकबाजी सुरू : विद्यापीठ प्रतिनिधी- विद्यार्थी संघटना आमने-सामने

ॅशिवाजी विद्यापीठातील निवडणुकीचा वाद रंगला
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अधिविभागीय विद्यार्थी मंडळाचा वाद रंगला असून त्यात विद्यापीठ प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्या आहेत. त्यात नि:पक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याने फेरनिवडणूक घेऊ नये, या मागणीचे निवेदन विद्यापीठ प्रतिनिधी व संशोधक विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिले आहे. दुसरीकडे ‘गायकवाडसाहेब, हाच का तुमचा विद्यार्थीभिमुख कारभार?’ असा सवाल करत आॅल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (एआयएसएफ) आणि आॅल इंडिया यूथ फेडेरशनचा (एआयवायएफ) उल्लेख असलेल्या पत्रकाद्वारे फेरनिवडणूक झालीच पाहिजे, अशी मागणी काहींनी केली आहे.
गेल्या आठवड्यात महाविद्यालय, विद्यापीठातील अधिविभागीय विद्यार्थी मंडळाच्या विद्यापीठ प्रतिनिधी, सचिवपदाच्या निवडणुका झाल्या. यावेळी अधिविभागीय विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत ‘एआयएसएफ’ आणि राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेने संबंधित निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर बुधवारी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील आणि विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी प्रतिनिधी आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने फेरनिवडणूक घेण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना दिले.
निवेदनात असे म्हटले आहे की, विद्यापीठातील अधिविभागीय विद्यार्थी मंडळाची निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार तसेच नि:पक्षपातीपणे घेतली आहे. मात्र, काही विद्यार्थी आणि नेतेमंडळींनी या निवडणुकीमध्ये आक्षेप नोंदविला.
निकालानंतर काहीजणांनी विद्यापीठात घातलेला दंगा आणि त्यांच्या कृतीचा निषेध करत आहोत. निवडणूक पारदर्शकपणे झाल्याने फेरनिवडणूक घेण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या शिष्टमंडळात विद्यापीठ प्रतिनिधी कोणार्क शर्मा, श्वेता परूळेकर, विवेक कोकरे, बाळासाहेब मकर, नितीन पाटील, विशाल कापसे, दीपक लाड, अमोल पांढरे, सुजितकुमार थिटे, सागर शिंदे, आशिष जाधव, संकेत शिंदे, राहुल मगदूम, किशोर सुतार, सागर चव्हाण, रामचंद्र गलंडे, दीपक कांबळे, समाधान गायकवाड, कौस्तुभ कांबळे, राहुल तांबीरे, श्रावण कांबळे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)