तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:30 IST2025-02-03T21:16:48+5:302025-02-03T21:30:26+5:30
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं.

तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख
Parliament Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेवर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी लोकसभेत इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरुन भाजप खासदारांनी त्यांना विरोध केला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता किरेन रिजिजू यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभेत सोमवारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भाषणानंतर हा गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्याचे खंडन केले. राहुल गांधी यांनी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे प्रश्न लोकसभेत उपस्थित केले होते. यावर किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर जोरदार प्रत्युत्तर देत विचारले की ते आंधळे आहात का? असा सवाल केला.
"राहुल गांधी गेली २-३ वर्षे या वर्गांबद्दल बोलत आहेत, पण त्यांना देशाचे पंतप्रधान दिसत नाहीत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठा ओबीसी चेहरा आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी यांना हे दिसत नाही का? ते काय आंधळे आहेत का? मी स्वतः अनुसूचित जमातीचा आहे आणि देशाचे संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करत आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील दलित आहेत," असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं.
"काँग्रेसने कधी कोणत्याही आदिवासी किंवा दलिताला देशाचा कायदामंत्री बनवले आहे का? काँग्रेसने कधी ओबीसीला पंतप्रधान केले आहे का?मला वाटतं राहुल गांधी काय बोलतात हे त्यांनाच माहीत नाही," असा टोलाही किरेन रिजिजू यांनी लगावला.
याआधी राहुल गांधी यांनी जातिय जनगणनेची मागणी लावून धरत देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये दलित-ओबीसी मालक नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. "देशातील ५० टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती आणि जमाती आणि ओबीसींची आहे. पण त्यांच्याकडे सत्ता नाही कारण ते आवाज उठवू शकत नाहीत. भाजपमध्ये ओबीसी, दलित आणि आदिवासी खासदार आहेत, पण ते बोलू शकत नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले.