मोदींच्या राजवटीत नागरिकांना कमी स्वातंत्र्य उरले; अमेरिकन संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:00 AM2021-03-06T05:00:00+5:302021-03-06T05:00:11+5:30

फ्रीडम हाऊस संस्थेचा दावा; राजकीय, नागरी हक्कांवर गदा

Under Narendra Modi's rule, citizens have less freedom | मोदींच्या राजवटीत नागरिकांना कमी स्वातंत्र्य उरले; अमेरिकन संस्थेचा दावा

मोदींच्या राजवटीत नागरिकांना कमी स्वातंत्र्य उरले; अमेरिकन संस्थेचा दावा

Next

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारतातील नागरिकांच्या राजकीय व नागरी हक्कांवर गदा आली आहे. त्यामुळे आता भारत नागरिकांना संपूर्ण नव्हे तर अंशत: स्वातंत्र्य देणारा देश बनला आहे असे फ्रीडम हाऊस या अमेरिकेतील संस्थेने यंदाच्या वर्षीच्या अहवालात म्हटले आहे. 
फ्रीडम हाऊस या संस्थेने असा दावा केला आहे की, भाजपचे हिंदुत्ववादी सरकार २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर त्याचा न्यायालयीन यंत्रणेत हस्तक्षेप वाढत आहे. 
भारतामध्ये मुस्लिमांविरोधात होणारा हिंसाचार, पत्रकारांना धाकदपटशा दाखविणे हे प्रकार सध्या वाढीला लागले आहेत. जागतिक पातळीवर लोकशाही देशांचे नेतृत्व करण्याची भारताची क्षमता मोदी सरकारच्या कारकिर्दीत कमी झाली आहे. फ्रीडम हाऊसने म्हटले आहे की, कोरोना साथ सुरू झाल्यानंतर मोदी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे असंख्य मजुरांना अक्षरश: पायी चालत आपले गाव गाठण्याची वेळ आली. या मजुरांचे प्रचंड हाल झाले. 

मोदींचे ‘एक्झाम वॉरिअर्स’ पुस्तक
या महिन्यात येणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरिअर्स’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे, असे पेंग्विन रँडम हाउस इंडियाने शुक्रवारी जाहीर केले. या आवृत्तीत मोदी यांनी पालकांसाठी दिलेले मंत्र, मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयांबद्दलची जागरूकता, तंत्रज्ञान आणि वेळेच्या व्यवस्थापनाच्या  भूमिकेचा समावेश करण्यात आलेला आहे. या ताज्या आवृत्तीत महामारीचे परिणाम, निर्माण झालेले अडथळे आणि अनिश्चितता, नव्या पद्धतीने दैनंदिन जगण्यात अचानक करावा लागलेले बदल दिसतील, असे प्रकाशन संस्थेने निवेदनात म्हटले आहे.
‘एक्झाम वॉरिअर्स’च्या नव्या आवृत्तीत काही नवे मंत्र समाविष्ट करण्यासाठी वेळ काढण्याची संधी मला महामारीने दिली. आता त्यात पालकांसाठी काही मंत्र आहेत तसेच विद्यार्थ्यांतील ‘एक्झाम वॉरिअर’ ला प्रेरित करील अशा अनेक गोष्टी नरेंद्र मोदी ॲपशी संबंधित आहेत,’ असे मोदी २८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले होते. नव्या आवृत्तीत विद्यार्थ्याला वर्गात आणि वर्गाबाहेर असणारी आव्हाने, स्वत:शीच त्याला करावी लागणारी स्पर्धा,  तंत्रज्ञान, कृतज्ञता आणि लक्ष्य निश्चित करणे याबाबत मार्गदर्शन असेल.

Web Title: Under Narendra Modi's rule, citizens have less freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.